गणपती अन् समज गैरसमज 

- दा. कृ. सोमण
Sunday, 1 September 2019

उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, हा प्रमुख गैरसमज. पण असे काहीही नसते, गणपती हा सर्व भक्तांसाठी आईप्रमाणेच प्रेमळ आणि मायाळू असतो. एखाद्या वर्षी घरात काही अडचण असेल तर गणपती आणला नाही तरीही चालतो.

उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, हा प्रमुख गैरसमज. पण असे काहीही नसते, गणपती हा सर्व भक्तांसाठी आईप्रमाणेच प्रेमळ आणि मायाळू असतो. एखाद्या वर्षी घरात काही अडचण असेल तर गणपती आणला नाही तरीही चालतो.

वडिलांच्या निधनानंतर मोठ्या मुलानेच गणपती आणावा असा काहीही नियम नाही. घरात गरोदर स्त्री असेल तर मूर्तीचे विसर्जन करू नये, असेही काही नाही. निर्माल्याचे पाण्यात विसर्जन करायची गरज नसते. त्याच्यावर पाणी शिंपडले की त्याचे विसर्जन होते, त्यानंतर ते खतासाठी वापरता येते. पूर्वी आपण पाच दिवसांचा गणपती आणत असलो तरी तो नंतर दोन दिवसांचाही आणता येतो.

विसर्जनाला मुहूर्त नसतो
गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाला कुठलीही वेळ किंवा मुहूर्त नसतो. लक्षात घ्या, आपण देवाचे विसर्जन करत नाही, उत्तरपूजा केल्यानंतर त्या मूर्तीत देवत्व संपते, मग आपण राहिलेल्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करतो. पूर्वी वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तीचे विसर्जन व्हावे, असा नियम होता. मात्र तेव्हा मूर्तींची संख्या मर्यादित होती. आता मूर्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पर्यावरणपूरक आणि प्रदूषण होणार नाही, अशा पद्धतीनेच विसर्जन केले पाहिजे. त्यामुळे घरातच बादलीत, हौदात, कृत्रिम तलावात, तळ्यात, ट्रकवरील मोबाईल हौदात विसर्जन केले तरी काहीही बिघडत नाही. अस्वच्छ घाणेरड्या नदीत विसर्जन करण्यापेक्षा कृत्रिम हौदात विसर्जन करणे केव्हाही चांगले.

उत्सवात पुण्यकर्म करावे
गणेशोत्सव आपापल्या क्षमतेनुसार आणि आपापल्या ताकदीनुसार करावा. एखादवेळी फुलं नसतील तर त्या जागी अक्षता टाकल्या तरीही चालू शकते. हल्ली अगरबत्ती आणि कापूर हे रसायनमिश्रित असल्यामुळे ते वापरू नयेत, त्याऐवजी तेला-तुपाचे दिवे लावावेत. गणपतीची पूजा स्वतः करणे केव्हाही चांगले. त्यासाठी पुस्तक कॅसेट आदींचा उपयोग करता येतो. शेवटी भाव तेथे देव, हे लक्षात ठेवावे. उत्सवामुळे आपल्या घरी नातलग येतात, आनंदाचे वातावरण निर्माण होते. त्यासाठी हा उत्सव करावा. माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणे वागावे, असे सनातन वैदिक धर्म सांगतो, त्याचे पालन आपण उत्सवात करावे. दुसऱ्यांना प्रेम देणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप, अशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची व्याख्या आहे. त्याचे आचरण आपण या गणेशोत्सवात करावे. गणेशोत्सव साध्या स्वरूपात करून त्यातून वाचलेले पैसे राज्यातील पूरग्रस्तांना दिले तरच ते खरे गणपतीला आवडणारे पूण्यकर्म ठरेल.

9 अंक ही ब्रह्मसंख्या
गणेशोत्सव, पितृपक्ष आणि नंतर नवरात्र या एकामागोमाग येणाऱ्या तीन धार्मिक बाबींचा अर्थ असा की पृथ्वीची पूजा (गणेशोत्सव), पितरांचे स्मरण (पितृपक्ष) आणि मग निर्मितीशक्तीची पूजा अर्थात नवरात्र. 9 अंक म्हणजे ब्रह्मसंख्या असून ती निर्मिती शक्तीशी संबंधित आहे. आईच्या पोटात मूल नऊ महिने नऊ दिवस राहते. बीज पेरल्यानंतर नऊ दिवसांनंतर त्याला अंकुर फुटतो. अशाप्रकारे विश्वाची निर्मिती आणि 9 याचे मोठे नाते आहे. त्यामुळे नवरात्र हा निर्मिती शक्तीचा सण असल्यामुळे तो नऊ दिवस केला जातो.

(लेखक पंचागकर्ते आणि प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)
(शब्दांकन : कृष्ण जोशी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh pujan and misunderstanding