esakal | इथे मनामनांत वसतो गणेश
sakal

बोलून बातमी शोधा

इथे मनामनांत वसतो गणेश

उत्सवप्रिय आणि देवभोळ्या कोकणी माणसाच्या स्वभावाची गणेशोत्सव ही ओळख आहे. विशेषतः दक्षिण कोकणात गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. येथे घरगुती स्वरुपात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील प्रथा परंपरा मात्र समाजाला एकत्र आणणाऱ्या आहेत. निसर्गाच्या अधिक जवळ नेणारा हा सोहळा आहे. या उत्सवाची कोकणात नेमकी कधी सुरवात झाली हे सांगणे कठीण आहे; मात्र या उत्सवाशी जोडलेल्या कितीतरी समृध्द, आणि तितक्याच गूढ गोष्टी दक्षिण कोकणाशी जोडलेल्या आहेत. या काही प्रमाणात आख्यायिकाही वाटतील. कारण त्या तर्कावर आधारलेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यातील काहींना स्पर्श करण्याचा हा प्रयत्न.

इथे मनामनांत वसतो गणेश

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

कोकणापासून श्री गणेशा

कोकण प्रांताची निर्मिती नेमकी कधी झाली हे सांगता येणे कठीण आहे. परशुरामाने मारलेल्या बाणामुळे समुद्र मागे हटल्याने हा प्रांत निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते; मात्र या भागाच्या निर्मितीत निसर्गातील बदलांची भूमिका महत्वाची आहे इतके नक्की. भूकंप किंवा ज्वालामुखीमुळे सह्याद्रीच्या रांगापर्यंतचा समुद्र मागे हटला गेला व त्यातून डोंगर-दऱ्या, विविध प्रकारची वृक्षराणी यांनी समृद्ध चिंचोळी पट्टी निर्माण झाली; तेच कोकण असा सिद्धांतही अनेक अभ्यासकांनी मांडला आहे.

संस्कृती बहरली

येथील गणेशभक्तीची सुरवात जाणून घेण्यासाठी वस्ती कोणी वसवली हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पूर्वी पूर्ण कोकणचा भाग जंगलाने व्यापलेला होता. सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेल्या दक्षिण कोकणात गावाची आकारणी आणि येथील गावऱ्हाटी यांचा जवळचा संबंध आहे. यात धार्मिक अधिष्ठानाला गाव आकारणीत महत्वाचे स्थान आहे. यात पूर्वी सोमवंश आणि नागवंशाच्या लोकांनी येथील गावांची आकारणी केल्याचे मानले जाते. गावऱ्हाटी म्हणजे विशिष्ट गावच्या सिमेत राहणारे मनुष्य प्राणीमात्र, तसेच अदृष्य शक्ती यांचे परस्परांशी संबंधित व्यवहार होय. निळकंठ नाईक, श्याम धुरी आदी अभ्यासकांनी दक्षिण कोकणातील गावऱ्हाटी, बारा-पाचाचे देवस्थान या विषयी अभ्यास करून काही अंदाज बांधले. त्यानुसार दक्षिण कोकणात गाव आकारणीची सुरवात आताचे महादेवाचे केरवडे व हळदीचे नेरुर या गावांच्या दरम्यान असलेल्या जटाशंकर मंदिरापासून झाली असावी. सोमवलंशाने चर्तुसिमा आखून मर्यादेती अर्थात शिवलिंगाची स्थापना केली. त्याची पुजा-अर्चा नागवंशाच्या व्यक्तीकडून होत असे. पुढे द्रवीड, आर्य या भागात आले. त्यांनी या धार्मिक रचनेत थोडेफार बदल केले. हळूहळू येथे देवस्थान, निसर्ग आणि त्या भोवती फिरणारी संस्कृती निर्माण झाली. बारा-पाच देवस्थाने गावोगाव स्थापली गेली. या देवस्थानात मुख्यत्वेकरून मर्यादेचे म्हणजे शंकराचे स्थान व देवस्थानचे प्रमुख ग्रामदैवत म्हणून माऊली, सातेरी आदी विविध नावाने शक्तीचे स्थान निर्माण करण्यात आले. दक्षिण कोकणात गावऱ्हाटीची एकूण ३६० गावे असल्याचे मानले जाते. यात पहिले स्थान महादेवाचे केरवडे किंवा हळदीचे नेरुर व शेवटचे स्थान म्हणून रेडी हे गाव ओळखले जाते. अर्थात या गोष्टी तर्कावर आधारित आहेत.

गणेशभक्तीनेच सुरवात

गावऱ्हाटी आणि गणेशभक्ती यांचे अतुट नाते आहे. शिव आणि शक्ती यांचे एकत्रित रुप म्हणूनही काही अभ्यासक गणेशाकडे पाहतात. पहिली गावऱ्हाटी स्थापन झालेल्या हळदीचे नेरुर येथील जटाशंकर मंदिराच्या शेजारीचे श्री गणेशाचे सुंदर मंदिर आहे. यालाही प्राचीन इतिहास आहे. यात गणेशाची काळेथर दगडातील देखणी मूर्ती आहे. त्याच्या बाजूला देवीचेही मंदिर आहे. याचाच अर्थ येथे शिव-शक्ती आणि गणपती ही तिन्ही रुपे असल्याने या एकूणच देवस्थानला पूर्णत्व आले आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरवात गणेश पुजनाने होते. याच ठिकाणाहून गाव आकारणी सुरू झाली असे मानण्यात येते.

ganesha-1.jpg

ganesha-1.jpg

रेडीतील गुढ

येथील गाव, गावऱ्हाटी यात हळदीचे नेरुर किंवा महादेवाचे केरवडे हे प्रथम स्थान आणि रेडी हे शेवटचे स्थान मानले जाते. या दोन्हींना तितकेच महत्व आहे. यातील हळदीचे नेरुरमध्ये गणपतीचे देवस्थान आहे. रेडी येथेही १ मे १९७६ ला उत्खननात गणेशाची द्विभूजा मूर्ती सापडली. या देवस्थानकडे दरवर्षी हजारो भाविक येतात. याच गावात साडे तीनशे ते चारशे वर्षापूर्वी यशवंतगड बांधला. या गडाच्या निर्मितीवेळी कोरलेली एक आकर्षक द्विभुजा गणेशमूर्ती आजही पहायला मिळते. ती मूर्ती आणि १९७६ मध्ये सापडलेली मूर्ती यांच्यात साम्य आहे. त्यामुळे या दोन गणपतींचा धार्मिकदृष्ट्या काही संबंध आहे का हे गुढ आहे.

गणेशोत्सवाची सुरवात

दक्षिण कोकणात गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. येथे घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा होतो. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते; मात्र टिळक मुळचे कोकणातील आहेत. त्यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. कोकणातही घरगुती गणेशोत्सव साजरा होत असला तरी याच्या विविध प्रथा परंपरा या समाजाला एकत्र आणणाऱ्या, निसर्गावर प्रेम करायला शिकवणाऱ्याच आहेत.

गणेशोत्सवाचे स्वरुप

येथील गणेशभक्ती जाणून घेण्यासाठी या उत्सवाचे स्वरुप लक्षात घेणे महत्वाचे आहे. पूर्वी सहसा मुख्य घराण्यात हा सोहळा साजरा केला जायचा. या निमित्ताने उत्सवकाळात सर्वजण एकत्र यायचे पुढे घरे वाढली, वस्ती वाढली व हा उत्सव साजरा होणारी ठिकाणेही वाढली. मात्र उत्सव साजरा करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथांमुळे समाज, माणसे या निमित्ताने एकमेकांशी जोडली जावू लागली. या उत्सव काळात एकत्रित भजन, एकत्रित गाऱ्हाणे, विसर्जनाच्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी पाहुण्यांना (पाचकार) आवर्जुन बोलविण्याची पद्धत, विसर्जनही एकत्रितरित्या करण्याची प्रथा या सगळ्यातून सामाजिक बंध अधिक घट्ट होतात.

निसर्गाजवळ नेणारा उत्सव

गणेशोत्सव येतो त्या काळात भात लावणीची कामे संपलेली असतात व कापणीला उशिर असतो. त्यामुळे शेतकर्‍यांकडे पुरेसा वेळही असतो. गणेशोत्सवात माटवीसाठी रानात मिळणारी फळे, फुले यांचा वापर केला जातो. गौरीचे प्रतिक म्हणून हळदीच्या रोपाची पुजा, आहारातही कंद, गौरीच्यावेळी पालेभाज्या या निसर्गाशी एकरुप करणार्‍या गोष्टी वापरल्या जातात. मूर्तीसुद्धा मातीचीच वापरली जाते. मूर्ती विसर्जनाचे स्थळही पारंपारिक पद्धतीने ठरलेले असते. एकूणच हा सगळा सोहळा निसर्ग पुजेशी जुळलेला आहे. या उत्सवात अगदी उंदरालाही महाप्रसाद (उपार किंवा वाडी) देण्याची पद्धत आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या कोकणाविषयी कोकणवासियांनी दाखविलेला आदर या सोहळ्यातून दिसतो. उत्सवाचे स्वरुप पाहता हा सण येथे निश्‍चित शेकडो वर्षापासून साजरा होत असणार असे म्हणता येईल.

महत्व आजही कायम

गेल्या काही वर्षात विकासगंगा कोकणापर्यंत पोहोचली, रहदारीची साधने वाढली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. असे असले तरी कोकणच्या गणेशोत्सवाचे महत्व तिळभरही कमी झालेले नाही. तो कोकणचा सिम्बॉलिक उत्सव म्हणून ओळखला जावू लागला आहे. आजही चाकरमानी त्याच उर्मिने आणि ओढीने या उत्सवासाठी येतात. जगात कुठेही असले तरी या उत्सव काळात कोकणची आठवण काढतातच. या उत्सवाच्या निमित्ताने भावनिक बंध आणखी घट्ट होतात. भविष्यातही या सोहळ्याचे महत्व कायम राहणार यात शंका नाही.

असा उत्सव, अशा प्रथा

  • दक्षिण कोकणात गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

  • लोकांना जवळ आणणाऱ्या प्रथा

  • लोकांमधील भावनिक बंध घट्ट करणारा उत्सव

  • निसर्गाविषयी आदर दाखविणाऱ्या प्रथा

  • जिल्ह्यात ६८३१३ घरगुती गणेशमूर्ती

  • ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव

loading image
go to top