esakal | लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

gauri pujan

लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : हळदी-कुंकवाच्या पायघड्यांवरून सुख-समृद्धीच्या पावलांनी, लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या गौराईचे घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, सण महिलांचा असल्याने आज गजऱ्यांना मागणी वाढली. त्यामुळे मोगऱ्याचा वितभर गजरा दहा ते १५ रुपयांना विकला जात होता.

गौरीचा सण हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा. तीन दिवसांसाठी आलेल्या गौराईचे आज महिलांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. हळदी-कुंकवाच्या पाण्यात हात बुडवून त्याचे ठसे जमिनीवर उमटवत घातलेल्या पायघड्यावरून गौराईचे आगमन झाले. आज सकाळी साडेनऊपासूनच गौरी आगमनाची सुरवात झाली. आता तीन दिवस राहणाऱ्या या गौरींच्या सरबराईत कोणतीही कमी राहू नये, यासाठी महिला झटत आहेत.

हेही वाचा: प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर्स बंधनकारच!

दरम्यान, गौरी बसविण्यासाठी महिलांची सकाळपासून लगबग सुरू होती. सुवासिनी प्रत्येकीच्या घरात जाऊन गौरीची पूजा करीत होत्या. त्यानंतर या गौरींना सजविण्यासाठी महिलांची धांदल उडाली होती. भरजरी साडी नेसविलेल्या गौरींना दागिन्यांनीही सजविले जात होते. आज महिलांच्या या सणामुळे फुलांचे दर वाढले होते. मोगऱ्याचा वितभर एकेरी गजरा चक्क दहा रुपयांना विकला जात होता. तर गौरीसाठीची शेवंतीची वेणी २० ते ३० रुपयांना विकली जात होती. तसेच आगमनादिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविला जातो. त्यामुळे शेपू आणि भोपळ्याच्या पानांची भाजी मुबलक प्रमाणात विक्रीस आली होती. शेपूची पेंडी दहा रुपयांना विकली जात होती.

गौरीपुढे फळांचे ताटही आवर्जून ठेवले जात असल्याने फळांचे दर किंचित वाढलेले होते. केळी ४० ते ५० रुपये डझन, सफरचंद १०० ते १५० रुपये किलो, मोसंबी १५० ते २०० रुपये किलोने विकली जात होती. विविध प्रकारच्या पाच फळांचे ताट ४० ते ५० रुपयांना विकले जात होते. आज सायंकाळपर्यंत गौरी आगमनासाठी मुहूर्त होता. त्यामुळे शेतकरी महिलांनी दुपारनंतर गौरी आणण्यास प्रारंभ केला.

आज पूजन, उद्या विसर्जन

उद्या (सोमवार) गौरी पूजन असून, मंगळवारी गौरींचे विसर्जन आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी ११ ते दुपारी दोन आणि दुपारी साडेचार ते सायंकाळी पाच या वेळेत विसर्जन मुहूर्त आहेत.

loading image
go to top