Video : `अक्षर गणेश` साकारताना...

मंदार कुलकर्णी
Saturday, 7 September 2019

या वेळी काय करूया असा विचार चालू असताना अचानक कल्पना आली, की आपण अक्षरांचा वापर का करायला नको. मग घरातले कार्डशीट्स घेतले, शेजारच्या दुकानातून अक्षरांच्या स्टिकरची एक पट्टी आणली आणि सुरू झालं डेकोरेशन.

गणपतीची सजावट हा खरं तर एक खूप आनंदाचा भाग असतो. त्यातून क्रिएटिव्हिटीच्या किती तरी शक्यता तयार होतात, उत्साहाचं घरभर सिंचन होतं, नेहमीच्या ठरलेल्या रुटिनमधून बाहेर पडणं होतं आणि विशेषतः मुलांना बरोबर घेऊन काही तरी केल्यामुळं तो नात्यांचा भाग पक्का करणंही होतं. त्यामुळं गणपती बसवणं हा भाग माझ्यासाठी तरी धार्मिक किंवा आध्यात्मिक नाही. उलट तो आहे हौसेचा भाग. आमच्या घरातला माझा सजावटीचा फंडा आहे तो म्हणजे `कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात करायची सजावट.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सजावट करायची असं कित्येक वर्षी घोकतोय, पण ते काही होत नाही-आणि होणंही नाही. त्यामुळं साधारण त्या दिवशी सकाळी `प्रतिभेच्या उत्कट क्षणी` कुठली तरी कल्पना घ्यायची आणि `कचऱ्यातून कला` या फंड्याचा वापर करून काही तरी वेगळं करायचं असं आमचं तंत्र. एका वर्षी घरातल्या सगळ्या कुंड्या, झाडं एकत्र केली आणि बाप्पांना छान झाडांच्या सान्निध्यात बसवलं. घरात जणू `जंगल राज`च! एका वर्षी चहाचे कप एकमेकांना फेविकॉलनं उलट आणि सुलट चिकटवत छान मंदिर तयार झालं. एका वर्षी घरातल्या `कुलस्वामिनी`च्या सगळ्या ओढण्या मागून घेतल्या आणि त्यांचा कलात्मक वापर करून सजावटीचं काम पुरं केलं. नंतर ओढण्या `सूत समेत` परत केल्यामुळं दुकानाच्या पायऱ्या चढायला लागल्या नाहीत. त्यामुळं त्या वर्षी जोरदार `हुश्श` म्हटलं हे वेगळं सांगायला नकोच. एका वर्षी वेगवेगळ्या पुरवण्यांत आलेले गणरायांचे सगळे फोटो कटआऊटसारखे कापून घेतले आणि एका मोठ्या बोर्डवर मोठा कोलाज तयार केला. बाप्पांची ती वेगवेगळी रूपं अर्थातच मनात ठसून गेली. गेल्या वर्षी मुलांनी वेगवेगळी शिबिरं, बालभवन, शाळेतल्या अॅक्टिविटीज यांच्यात केलेली वेगवेगळी फुलं एकत्र केली. सुई आणि दोरा घेऊन ही सगळी फुलं खिडकीच्या गजांना वेगवेगळ्या प्रकारे चक्क शिवली आणि ते एक वेगळंच डेकोरेशन तयार झालं...आणि हो!घरात इकडं तिकडं पडलेली आणि टाकायला नकोत म्हणून पडून असलेली फुलं छान पद्धतीनं विसर्जित झाली हेही एक बरंच झालं.

या वेळी काय करूया असा विचार चालू असताना अचानक कल्पना आली, की आपण अक्षरांचा वापर का करायला नको. मग घरातले कार्डशीट्स घेतले, शेजारच्या दुकानातून अक्षरांच्या स्टिकरची एक पट्टी आणली आणि सुरू झालं डेकोरेशन. अक्षरं हा मुलांच्या दृष्टीनं अगदी सोपाच भाग. मुलगा सेतू चित्रकलेच्या क्लासला जाणारा, पत्नी मैत्रेयी क्लासटीचर असल्यामुळं क्राफ्ट्सचा दांडगा अनुभव असलेली. त्यामुळं मग त्यांच्या आयडियाज आल्या. सेतूनं चित्रकलेच्या क्लासमधून आणलेल्या स्टेन्सिल्सचा वापर केला, मैत्रेयीनं शेजारच्यांनी टाकून दिलेले बॉक्स उचलून आणले. या सजावटीला खरा वेग आला तो पुतण्या अन्शुल आणि वहिनी मृणाल आल्यावर. अन्शुलला तर सजावट अक्षरशः `चढली.` त्यानं मग 0चा आकार कापताना आत मोदक तयार करणं वगैरे कल्पनाही केल्या. सुरवातीचा उत्साहाचा भर ओसरल्यावर अस्मादिक, सेतू आणि अन्शुल ढेपाळले आणि घरातली महिलाशक्तीनं खरा हातभार लावला. मैत्रेयी, मृणालनं धडाधड अक्षरांचे आकार कापले, चिकटवले. घरोघरी हेच होत असणार हे काही वेगळं सांगायला नकोच. शेवटी गणपतीच्या मखराच्या ऐवजी ओम या अक्षराचा वापर करायचा अशी कल्पना सुचली, ती मैत्रेयी-मृणालनं प्रत्यक्षात आली आणि एकदाचं सजावट नाट्य संपलं.

ही सगळी अक्षरं असल्यामुळं मग अक्षरांचा समावेश असलेल्या पु्स्तकांचाही वापर करूया अशी कल्पना आली. मग एकेक पुस्तकांचे गठ्ठे मांडले, त्यांची कलात्मक मांडणी अन्शुलनं केली. सेतूच्या जुन्या वह्यांचे पुठ्ठेही वापरले आणि `अक्षरगणेश` साकार झाले.

सध्याचं जग डिजिटल आहे. त्यामुळं ही सगळी प्रक्रिया व्हिडिओंमधून का उलगडायला नको असाही विचार मनात आला आणि मग तेही सगळं जमून आलं. एक मोबाईल हाताशी असला, की काय काय करता येतं हेही त्या निमित्तानं लक्षात आलं. ही सगळी प्रक्रिया धमाल होती. आता असं वाटतंय, की ही प्रक्रिया संपलेली नाही. उलट आता कुठं आपण डिजिटल अक्षरं गिरवायला लागलो आहे. अक्षरांना अक्षरं जोडली जातील आणि व्हिडिओंमधून चित्रभाषाही यायला लागेल. ही भाषा धमाल असणार...तूर्त तिची `अक्षर`ओळख झाली आहे इतकंच!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar kulkarni and his family created Askhar Ganesh