esakal | गणेशोत्सव ‘कौशल्य कार्यशाळा’
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव ‘कौशल्य कार्यशाळा’

गणेशोत्सव ‘कौशल्य कार्यशाळा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-विनोद सातव (satav.vinod@gmail.com)

सार्वजनिक गणेशोत्सव ही एक कौशल्य कार्यशाळा आहे. त्यात भाग घेणाऱ्या प्रत्येकाच्या ‘अंगभूत कौशल्या’ला पैलू, तर पडतातच; पण त्याबरोबर समाजहिताशी त्या प्रत्येकाची नाळ जोडली जाते, ती कायमची.

श्रावण सुरू होताना ढोल-ताशा पथकांच्या तालमींचा निनाद कानावर पडला, की बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागते आणि अंगात एक अदृश्य स्फुरण चढतं! पण ढोल-ताशांचा हा जादुई ठेका गतवर्षीप्रमाणं यंदाही वाजणार नसला, तरीही प्रत्येक सश्रद्ध मनातलं ते स्फुरण तसचं अबाधित आहे आणि राहील! ही किमया आहे ‘गणेशोत्सव’ नामक ‘राष्ट्रीय सोहळ्या’ची! ही एक मोठी ‘कौशल्य कार्यशाळा’ आहे! या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाच्या ‘अंगभूत कौशल्या’ला पैलू, तर पडतातच; पण त्याबरोबर समाजहिताशी त्या प्रत्येकाची नाळ जोडली जाते, ती कायमची! सर्वसमावेशकता, एकता, सकारात्मकता, परिवर्तनशीलता आणि सामाजिक भान इत्यादी शाश्वत मूल्यांमुळं समाजमनावर हा उत्सव अनेक वर्षं अधिराज्य गाजवत आहे!

रोजगारनिर्मिती घडवणारा उत्सव

मोरयाच्या या उत्सवकाळात होणाऱ्या सामाजिक स्थित्यंतराबरोबरच अर्थकारणातही मोठे सकारात्मक बदल घडतात! ‘असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’च्या २०१५ च्या अभ्यासानुसार, देशभरात या उत्सवकाळात अंदाजे ३० हजार कोटींची उलाढाल होते! या आकड्यात दरवर्षी २० टक्के वाढ दिसते. उत्सवाची व्याप्ती त्यावरून लक्षात येते. पूजेचं आणि रोषणाईचं साहित्य, प्रसाद, मांडव, साऊंड, बँड, मिरवणूक, कलाकारांची आणि कलापथकांची मानधनं, तंत्रज्ञ, कारागीर, लेखक, स्टुडिओ, मुद्रणालयं, हॉटेल व्यवसायिक आणि असे अनेक घटक यात सामावले जातात! या सगळ्या सेवा पुरवणाऱ्या घटकांमुळं सगळ्या स्तरांतील व सगळ्या जाती-धर्मांचे लोक एकत्र येतात आणि एका ‘एकसंध प्रवाहात’ सरमिसळून जातात, हीच या उत्सवाची एक मोठी ताकद. हा उत्सव नेतृत्वगुणही घडवत आहे!

‘संघटन कौशल्य’ शिकण्यासाठी मोठी फी न भरता, गणेश मंडळाच्या मांडवात बाप्प्पासाठी, एकजुटीनं पडेल ते काम करून मोठे नेते घडल्याची उदाहरणं आहेत. असंख्य कार्यकर्ते आपल्या मंडळाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी धडपडतात. त्यांनी केलेल्या छोट्याशा कामाचीही दखल घेतली जाते आणि त्यामुळं ‘मंडळाच्या अहवाला’त त्यांचं नाव छापून येतं, तेव्हा हे कार्यकर्ते तो अहवाल किती अभिमानानं मिरवतात! घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणं, देखावा ठरवणं, मांडवांच्या झालरी लावणं, प्रसाद वाटप, निर्माल्य नियोजन, मांडव स्वच्छता, अहवाल छापणं, जाहिराती मिळवणं, शासकीय परवानग्या काढणं, गर्दीचं नियोजन करणं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, मंडळाचे पैसे कसे आणि कुठं वाचवता येतील, याच्या युक्त्या काढणं, सदस्यसंख्या वाढवण्याच्या क्लृप्त्या योजणं, कार्यकर्त्यांमध्ये प्रसंगी होणारे मतभेद मिटवणं, वगैरे कितीतरी कामे ते करीत असतात. अगदी मूर्ती रंगवून आणण्यापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत सारं काही ते करतात. हे सगळं करत असताना ‘अंडर वन रुफ – एकाच मांडवात’ एखाद्या कार्यकर्त्याचे अंगभूत कौशल्य विकसित होऊन एका गणेशभक्त-कार्यकर्ताचे गुण सिद्ध होऊ लागतात! त्यामुळं एक साधा प्रसाद वाटणारा कार्यकर्ता, पुढं मंडळाचा पदाधिकारी किंवा अध्यक्ष होतो आणि त्यातून संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित होऊन नगरसेवकही होतो! पुढं हाच प्रवास आमदार – मंत्री – खासदार अशा उच्च पदापर्यंत पोचू शकतो. त्यामुळं त्यांचा हा ‘गल्ली ते दिल्ली’चा प्रवास गणेश मांडवातून जातो, असं गंमतीनं म्हणायला हरकत नाही. अगदी राजकीय वारसा नसलेल्या, परंतु सक्षम कार्यकर्त्याला ‘गणेशोत्सव’ नेतृत्व बहाल करत आला आहे! झोपडीवजा घरापासून ते थेट ‘वर्षा’वर विराजमान होणारा बाप्पा भक्तांच्या अनेक कलागुणांना आशीर्वाद देत असतो.

राजकीय नेत्यांचं आणि गणेशोत्सवाचे ‘कनेक्शन’ घट्ट आहे! त्यामुळं एकमेकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देणारे राजकीय कार्यकर्ते आणि नेते मांडवात एकत्रित येताना आपापले ‘राजकीय जोडे’ मांडवाच्या बाहेर ठेऊन येतात आणि एकसुरात ‘गणपती बाप्पा मोरया!’चा गजर करतात! त्यांचं हे एकत्रित येणं, प्रत्येक शहरातून निघणाऱ्या बाप्पाच्या मिरवणूकांमधूनही दिसतं! दोन विरोधक श्रद्धेनं बाप्पाच्या पालखीचे ‘भोई’ होतात, तेव्हा मला हा उत्सव लोकशाही बळकट करणारं एक प्रभावी माध्यम आहे, असं वाटतं !

कोरोनाकाळातील समाजभान

गणेशोत्सवाचे हेच सामर्थ्य लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्येच ओळखलं आणि पुण्यात १८९२मध्ये छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिलं! त्यांच्या चळवळीतून गणेशभक्तांमधून पुढं काही देशभक्तही झाले आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कामी आले! देशकार्याची सुरुवात समाजकार्यानं होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांचं हे ‘समाजभान’ कोरोनाकाळात अधिकच अधोरेखित झालं! शासनानं घालून दिलेल्या नियमांत कार्यकर्ते गणेशोत्सव साधेपणानं साजरा करत आहेत आणि त्यातून वाचलेला पैसा वर्षभर सामाजिक उपक्रमांमध्ये खर्च करीत आहेत. सुसंस्कृत कार्यकर्त्यांनी कोरोनाकाळात हलते देखावे न उभारता ‘माणुसकीचे जिवंत देखावे’ उभे केले! हे ‘सकारात्मक परिवर्तन’ आपण यापूर्वीही पाहिलं आहे!

मधल्या काळात सार्वजनिक उत्सवाचा मूळ हेतू विसरला गेला आणि या उत्सवाला काही ठिकाणी अप्रिय स्वरूप आलं होतं. त्यामुळं अशा ठिकाणी ‘पांढरपेशा वर्ग’ मांडवांपासून दुरावला होता; पण तेव्हा मांडवातले सुज्ञ कार्यकर्ते पुढं सरसावले आणि त्यांनी ‘समाजभाना’बरोबरच ‘पर्यावरणभान’ राखून या उत्सवाला एक ‘विवेकीभाव’ देण्यात सिंहाचा वाटा उचलला! उत्सवामध्ये रमलेला आणि मुरलेला कार्यकर्ता श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कर्ता ठरला. परंपरा जपताना परिवर्तनाचे नवे स्रोत त्यानं स्वीकारले. ‘सामाजिक समरसता’ हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्राण आहे. ती समरसता कोरोनाकाळात जशी दिसली, तशी ती ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनोत्तर’ काळात बाप्पाच्या आशीर्वादानं तशीच अबाधित राहणार आहे आणि हेच या उत्सवाचं यश आहे! ‘भक्ती’च्या या वारशात मोठी ‘शक्ती’ आहे! समाजाला आधारभूत ठरणारे कार्यकर्ते ही या गणेशोत्सवाची संपत्ती आहे.

loading image
go to top