पुणे : गुंडांचा गणपती...

पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे.
Gundacha Ganpati
Gundacha GanpatiSakal

पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे. पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. 'त्याच्या घराजवळील गणपती' असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे.

पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे.सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे.

नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल १९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या मूर्तीसाठी वारजे येथील गणपती माळावरून दोन टन वजनाचा दगड निवडण्यात आला होता. त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते (१८७६पासून). मूळ मूर्ती गाभाऱ्याच्या मागे ठेवलेली आहे.लोकमान्य टिळकांचे गुरू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातुःश्रींनी पुत्रप्राप्तीसाठी येथेच कडक उपासना आणि नवस केला होता.

पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी,असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com