का करावी गणपतीची पूजा? जाणुन घ्या शास्त्र

दा. कृ. सोमण
Sunday, 1 September 2019

गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा देव आहे. त्याचे ते गुण आपल्यात यावेत म्हणून गणपतीची पूजा करावी. चांगले शिकण्यास कधीही उशीर होत नाही, त्यामुळे दरवर्षी आपण काही ना काही नवे शिकावे, दरवर्षी नवे काहीतरी शिकण्याचे स्मरण राहावे म्हणून गणपतीची पूजा करायची

गणपतीची पूजा म्हणजे एका अर्थाने पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य उगवलेले असते, आपले पोषणकर्ती पृथ्वी हे धान्य निर्माण करते, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या गणेशमूर्तीची म्हणजेच पार्थिव गणेशमूर्तीची पूजा करावी, असे जुन्या शास्त्रात म्हटले आहे.

मूळ शास्त्रांमध्ये तर असेही वर्णन आहे की, नदीकिनारी जाऊन तेथील माती घेऊन मूर्ती तयार करावी, तिची तेथेच पूजा करावी आणि तेथे लगेच तिचे विसर्जन करावे. मात्र आता आपल्याला मूर्ती तयार मिळत असल्यामुळे आपण त्या घरी आणतो आणि आपापल्या मर्जीनुसार अनंत चतुर्दशीपर्यंत घरी ठेवतो. तसे पाहिले तर अनंत चतुर्दशीचा आणि गणपतीचा काही संबंध नाही, पण पौर्णिमेला प्रतिपदा श्राद्ध सुरू होते, त्यापूर्वीचा दिवस म्हणून अनंत चतुर्दशीला तरी विसर्जन करावे, अशी प्रथा आहे.

गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा देव आहे. त्याचे ते गुण आपल्यात यावेत म्हणून गणपतीची पूजा करावी. चांगले शिकण्यास कधीही उशीर होत नाही, त्यामुळे दरवर्षी आपण काही ना काही नवे शिकावे, दरवर्षी नवे काहीतरी शिकण्याचे स्मरण राहावे म्हणून गणपतीची पूजा करायची.

गणपतीने वेगवेगळ्या कारणांसाठी राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा (भाद्रपद, वैशाख पौर्णिमा आणि माघ) जन्म घेतला आहे, म्हणूनच वर्षातून तीनदा गणेशोत्सव होतो. त्याचप्रमाणे आपणही आपल्या आतले असुर मारण्यासाठी म्हणजेच अंधश्रद्धा, आळस, व्यसन, अनिती असे राक्षस मारण्यासाठी गणपतीची पूजा करावी.

(लेखक पंचागकर्ते आणि प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)
(शब्दांकन : कृष्ण जोशी)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why do we worship Ganesha? Know the fact