esakal | बाप्पा खरंच आहे...
sakal

बोलून बातमी शोधा

bappa kharach aahe

गणपती बाप्पा हा माझ्या मते सर्वात लोकप्रिय देवता आहे असे म्हणता येईल. खरंतर बाप्पाला देवापेक्षा एक मित्र म्हणूनच पहिले जाते. आपली गाऱ्हाणी, पीडा, आणि आयुष्यातले चढ उत्तर लाखो लोक बाप्पाच्या चरणी मस्तक ठेऊन बाप्पाला सांगतात आणि तो नक्कीच आपली सगळी विघ्न संपवेल असा त्यांचा दृढ विश्वास असतो. मी खरेतर फार देव देव न करणारा माणूस

बाप्पा खरंच आहे...

sakal_logo
By
कुशल कुबेर

गणपती बाप्पा हा माझ्या मते सर्वात लोकप्रिय देवता आहे असे म्हणता येईल. खरंतर बाप्पाला देवापेक्षा एक मित्र म्हणूनच पहिले जाते. आपली गाऱ्हाणी, पीडा, आणि आयुष्यातले चढ उत्तर लाखो लोक बाप्पाच्या चरणी मस्तक ठेऊन बाप्पाला सांगतात आणि तो नक्कीच आपली सगळी विघ्न संपवेल असा त्यांचा दृढ विश्वास असतो. मी खरेतर फार देव देव न करणारा माणूस. माझा अध्यात्मिक गोष्टींवर फार विश्वास नव्हता पण माझ्या एका मैत्रिणीला (जी आता माझी पत्नी आहे) बाप्पा खरंच आहे यावर दृढ विश्वास होता आणि नेहमी बोलताना ती तिचे अनुभव सांगत असत आणि मी नेहमीप्रमाणे असं काही नसते असे म्हणत. तिच्या हट्टामुळे मी एकदा पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या आरतीला तिच्याबरोबर गेलो. तिथे आलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि डोळ्यात बाप्पा प्रतीचा विश्वास दिसत होता. सर्व भक्त आरती मध्ये तल्लीन झाले होते आणि तेव्हा मलाही एक वेगळीच ऊर्जा जाणवली. ती ऊर्जा अतिशय सकारात्मक वाटली आणि कधी मीही आरतीमध्ये तल्लीन झालो हे मलाही कळले नाही. या प्रसंगाने मी विचारात पडलो होतो पण नंतरदेखील पूर्ण विश्वास मला बसला नव्हता. 

त्यानंतर अनेक वेळेला मी आरतीला गेलो आणि तोच अनुभव येत गेला. आयुष्याच्या एका टप्प्यावर शैक्षणिक दृष्ट्या कठीण काळ होता. आयुष्यात प्रचंड चढ उतार सुरु होते. काहीच व्यवस्थित होत नसल्याने नैराश्य येऊ लागले होते. तेव्हा पुन्हा मी आरतीला गेलो आणि हाथ जोडून , डोळे मिटून मनातून आयुष्य रुळावर यावे यासाठी मनापासून प्रार्थना केली. अनेक दिवस काही झाले नाही पण हळू हळू शैक्षणिक दृष्ट्या आयुष्य रुळावर येऊ लागले. नैराश्य हळू हळू कमी होऊ लागले आणि त्यामुळे सर्व गोष्टी प्रगतीपथावर दिसू लागल्या. तेव्हा मला बाप्पाची अनुभूती येऊ लागली. त्यानंतर देखील जेव्हा लग्न करायचे आम्ही ठरवले तेव्हा अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागत होते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे अडथळे निर्माण होऊ लागले होते आणि त्याचमुळे काय करावे हे मला सुचत नव्हते. मानसिकदृष्ट्या अतिशय कठीण काळ होता तो. तेव्हा अचानक चेतन गायकवाड या माझा मित्राशी बोलताना गणपतीपुळे ला जाण्याचा प्लॅन ठरला. गणपतीपुळे च्या मंदिरात बाप्पाच्या चरणी डोके टेकवून प्रार्थना केली आणि खरंच जणू बाप्पाने माझे गार्हाणे ऐकून तथास्तु म्हटल्याचा अनुभव मला आला. तिथून पुण्यात परत येताच सर्व गोष्टी सुरळीत होऊ लागल्या आणि सर्व अडथळे एकापाठोपाठ दूर होऊ लागले आणि कोणतेही विघ्न ने येता आमचे लग्न पार पडले आणि तोच क्षण होता जेव्हा माझ्या मानाने देखील बाप्पा खरंच आहे हे मान्य केले आणि बाप्पा खरंच विघ्नहर्ता आहे हे मलाही पटले. 

हा मला आलेला अनुभव असून अनेकांना तो अंधश्रद्धा वाटू शकतो पण तसा माझा कोणताही हेतू नाही. माझ्या अनुभवाने मी नक्की सांगू शकतो माझ्यासाठी तरी बाप्पा खरंच आहे...