esakal | दीड दिवसाचा 'घरचा गणपती' वर्षभर पुरतील एवढ्या आठवणी द्यायचा
sakal

बोलून बातमी शोधा

ganesha dubai

सार्वजनिक गणेशोत्सव अजून वेगळा कसा असणार ? लहानपणी हा प्रश्न आम्हाला नेहमी पडायचा. कारण आमच्या घरातल्या दीड दिवसाच्या गणपती उत्सवाच भव्य स्वरूप.

दीड दिवसाचा 'घरचा गणपती' वर्षभर पुरतील एवढ्या आठवणी द्यायचा

sakal_logo
By
तुषार कर्णिक, दुबई

घरच्या प्रथेप्रमाणे श्रावणात नाग पंचमीच्या दिवशी गणपती मूर्तीची नोंदणी केली जायची. त्यावेळी आपला गणपती हा उभ्या मांडीचा असतो हे मोठ्या अभिमानाने सांगितले जायचे. त्यामागचा मुळ हेतू हा कि पुढच्या पिढीला सर्व गोष्टींची माहिती असावी. एकाअर्थी मूर्तीची खास अशी ठेवण इथपासूनच आमच्या गणपतीच वेगळेपण प्रतीत व्हायच. मूर्तीची नोंदणी हि  गणपतीच्या आगमनाची चाहूल असायची. शाळेतून घरी येताना मूर्तिकारांच्या कारखान्यात डोकावून येणे हा शिरस्ता होता. साधारणपणे कारखान्यातील गणपतींच्या स्वरुपात जसे बदल घडत जायचे त्यावरून उत्सव  किती जवळ येत आहे याची जाणीव व्हायची.

पूर्वी आमचा गणपती डोंबिवलीला मोठ्या घरी म्हणजेच मोठ्या काकांकडे ( बाबा काका ) आणला जायचा. अत्यंत ऐसपैस अस एकमजली घर. घराच्या खाली सुरेख अंगण आणि बाजूला छोटीशी फुलांची बाग. आमचे भाई काका ज्यांनी मोठ्या आवडीने हि बाग फुलवली होती. बागेच वैशिष्ट्य म्हणजे बागेत असलेल " अनंताच " झाड. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या फुलांनी हे झाड नेहमीच बहरलेल असायचं. श्रावणात हि बाग बऱ्यापैकी  माजलेली असायची. विविध प्रकारची फुल आणि मुख्य म्हणजे दुर्वा ह्यामुळे बागेला आजूबाजूच्या परिसरात त्यातही श्रावण  आणि भाद्रपद  ह्या सणांच्या  महिन्यात मानाच स्थान असायचं. 

जसजसे गणपती जवळ यायचे तशी आमची पाऊले मखर आणि इतर तयारी करण्याच्या उद्देशाने मोठ्या घरी वळायची. मखर करणे हा देखील त्यावेळी एक उत्सवच असायचा. मखर आणि इतर सर्व सजावट हि आमच्या वडिलांची म्हणजेच अण्णांची मक्तेदारी होती. उपलब्ध साहित्यामधून मखर करणे हे खरे कसब होते. बांबूच्या काठ्या घेऊन त्या चांगल्या तासून घेऊन त्याना सुतळ बांधून मंदिर किंवा तत्सम प्रकारच्या रचना केल्या जायच्या. त्यावर वेगवेगळया रंगांचे कागद लावून ते सुशोभित केले जायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे कागद चिकटवण्यासाठी  त्यावेळी " खळ " ( गव्हाच्या पिठाची )  वापरली जायची. एकूण काय १००% ECO Friendly मखर तयार व्हायचे ज्यासाठी आज सर्वत्र प्रबोधन केले जाते.

आणखी वाचा - गणेशोत्सवात उत्तम आरोग्य आणि 21 पत्रींचे महत्व

साधारणपणे गणपतीच्या १-२ दिवस आधी  हे मखर तयार व्हायचे. मात्र मांडणी गणपती येण्याच्या आदल्या दिवशी केली जायची. आदल्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कुटुंबीय मोठ्या घरी उत्सवाच्या तयारीसाठी जमत असु. पुरुष मंडळींचे काम म्हणजे  मखर करणे , गणपती जिथे बसले जायचे त्या जागेची सजावट करणे, दिव्यांचे Focus करणे  ज्या साठी लाल आणि पिवळ्या रंगाचे जिलेटीन पेपर वापरले जायचे, घरातील सामान हलवणे वगैरे वगैरे. घरातील सर्व स्त्रियांचे काम म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी करणे त्यातही प्रामुख्याने बिरडे करण्यासाठी " वाल " सोलणे. फक्त स्त्रियाच नाहीत तर सर्वच जण  ह्या कामात जुंपले जायचे आजीच्या देखरेखीखाली अत्यंत धमाल वातावरणात ह्या सर्व गोष्टी केल्या जायच्या. साधारणपणे १२-१ पर्यंत हि तयारी चालायची. अशातच पहाटे साधारण ३- ४  च्या सुमारास  आमची आजी गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक बनवण्यास सज्ज  व्हायची ते देखील सोवळ्यात. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे प्रत्येक मुलाचे २१ आणि प्रत्येक नातवाचे ११ असे एकूण १२५-१५० मोदक आमची आजी अत्यंत हसतखेळत बनवायची. जांभळ्या रंगाच्या सोवळ्यात मोदक बनवताना आजीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असे तेज आणि समाधान दिसायचे. 

सकाळी साधारण ७-८ वाजता  सर्वजण गणपती आणायला निघायचो. गणपती आणताना ज्या विलक्षण भारदस्त आवाजात आमचे नाना काका मोरयाचा गजर करायचे  तो ऐकून  आजूबाजूच्या परिसरात आमच्या घरी गणपतींचे आगमन झाल्याची वर्दी मिळायची. पारंपारिक रीतिरिवाजाप्रमाणे गणेश स्थापना , पूजाअर्चा झाली कि आम्ही सर्वजण सोवळे नेसून  गणपतीला दुर्वा वाहायचो. सोवळे नेसवून घेताना किंवा स्वत: नेसताना जो सावळा गोंधळ व्हायचा ती एक वेगळीच गमत होती. हे सर्व सुरु असताना आम्हा मुलांची एक नजर वर गच्चीकडे लागलेली असायची कारण " पतंग ",  वातावरण बऱ्यापैकी चांगले झालेले असायचे त्यामुळे एकत्र पतंग उडवणे  हि त्याकाळी गणपतीच्या दिवसातील चैन होती. मुलांबरोबर सर्व काका मंडळी देखील ह्यात उत्साहाने सहभागी होत असत. साधारण दुपारपर्यंत पतंगबाजी झाली कि आपसूक सर्वजण  गच्चीतून खाली जेवण्यासाठी यायचे.

पहिल्या दिवशीचे  सकाळचे  एकत्र जेवण हा उत्सवाचा अविभाज्य घटक होता. वालाच " बिरड " , अळूची भाजी आणि आजीच्या हातचे उकडीचे मोदक हि जेवणाची खासियत. साधारण २ ते ३ पंगती मध्ये दुपारच ? जेवण ३ वाजेपर्यंत चालायचं. जेवण झाल्याबरोबर सगळ्यांनाच त्यातही प्रामुख्याने आम्हा मुलांना वेध लागायचे लागायचे ते " मोठ्या आरतीचे " त्यासाठी मग ढोलकी काढली जायची गव्हाच्या पिठाची कणिक त्यावर तिंबून ढोलकी आरतीसाठी तयार केली जायची. शक्य झाल्यास तबला , पेटी ची देखील  व्यवस्था केली जायची.

आणखी वाचा - काय आहे गणेश मंत्रांचा गुढार्थ

" मोठी आरती " गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण
आरतीला उपस्थित राहण्यासाठी सर्व आत्या , वडिलांची  चुलत, आत्ये, मामे अशी सर्व भावंडे दूर दुरून यायची. काही जणांची  भेट तर वर्षभरातून  केवळ ह्या आरती निमित्त सर्वाना घडायची. अशी सर्व मंडळी जमेपर्यंत साधारण रात्रीचे १० वाजायचे आणि " मोठी आरती " सुरु करण्याची लगबग सुरु व्हायची. अत्यंत सुरेख असे वातावरण तयार व्हायचे कमीतकमी ८० - ९० च्या संख्येने लोक जमलेले असायचे आणि आरतीची सुरुवात केली जायची. एकामागोमाग एक विलक्षण लयीत , सुरात , तालात आरत्या म्हटल्या जायच्या. ठराविक आरत्या हि काही जणांची खासियत होती  त्यामुळे त्या आरतीची सुरवात त्याच व्यक्तीकडून केली जायची. काही आरत्या म्हणताना आवाज खूपच वरच्या पट्टीत लावायला लागायचा अशावेळी आम्हा मुलांसाठी ती पर्वणी असायची. 

" मोठया आरतीच  " खास वैशिष्ट्य म्हणजे कमीतकमी ५० - ६० आरत्या . त्यावेळी आणि आजही खूपच अभिमानाने आम्ही  हि गोष्ट सर्वाना सांगतो. एक म्हणजे इतक्या आरत्या आहेत हेच कित्येकाना माहित नसत. मात्र हा अद्भुत असा ठेवा आपल्या पुढच्या पिढीला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि तो जतन करून ठेवावा ह्या विचाराने आमच्या बाबा काकांनी त्यांच्या हैद्राबाद च्या कालावधीत ह्या सर्व आरत्या लिहून काढल्या आणि आपल्या काकांना आणि प्रत्येक भावाला आपल्या स्वहस्ताक्षरात लिहिलेला हा अनमोल असा " आरती संग्रह " भेट म्हणून दिला. 

मोठी आरती साधारण पणे १ ते दीड पर्यंत चालायची. आरती च्या कालावधीत संपूर्ण घरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरात देखील एक अद्भुत असे वातावरण निर्माण व्हायचे. कित्येक जाणारे येणारे लोक देखील आरती ऐकून आमच्यात सामील व्हायचे. अशातच आरतीची सांगता होताना प्रदक्षिणा घातली जायची आणि सर्वाचे त्या गजरात देहभान हरपून जायचे. आणि  " प्रसादाची "  वेळ यायची. नुसता देवाला दाखवायचा प्रसाद नाही तर " प्रसादाची " एक आरती घेतली जायची. हा प्रसाद म्हणणे हि आमच्या नाना काकांची खासियत. अत्यंत तडफेने सर्व मुला-बाळांना एकत्र करून ते हा प्रसाद म्हणायचे. जवळपास ५-१० मिनिटे तरी हा प्रसाद म्हटला जायचा आणि त्यातील शेवटची ओळ " गणपती बाप्पा मोरया s s पुढच्या वर्षी  लवकर या " म्हणताना आपसूक आवंढा गिळला जायचा. प्रसाद म्हणून झाल्यावर " मोठ्या आरतीची " सांगता व्हायची.

जागरण
जागरण करणे हा ह्या उत्सवाचा स्थायीभाव त्यामुळे साधारणपणे २०-२५ मिनिटांची विश्रांती घेतल्यावर पुन्हा सर्वजण  ताजेतवाने होऊन भजनासाठी तयार व्हायचे. अत्यंत सुरात नाना विविध प्रकारची पारंपारिक भजन त्यावेळी गायली जायची. पहाटे सुरेख अशी भैरवी घेऊन ह्या जागरणाची इतिश्री व्हायची.

 " गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "  अशी प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी सायंकाळी गणपतीचे विसर्जन केले जायचे. फक्त दीड दिवसांचा असा हा आमचा " घरचा  गणपती "  वर्षभर पुरतील अशा आठवणी आमच्या मनात ठेवून जायचा.