चिपळूणातील गणेशोत्सवासाठी पालिकेने आणली ही खास योजना

मुझफ्फर खान
Friday, 21 August 2020

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या 

चिपळूण (रत्नागिरी) :  कोव्हिड -19’ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनूसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेने गणेश विसर्जन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना आणली आहे.त्यामुळे विसर्जनला होणारी गर्दी टाळता येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोकाही टळणार आहे.

गणेश विसर्जन प्रसंगी मिरवणूकीस़ पूर्णतः बंदी आहे. नागरिकांनी गणेश घाटावरही विसर्जनास येवू नये असे आवाहन प्रशासननाने केले आहे. मात्र गणेशभक्तांची, नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी फिरता कुत्रिम तलाव हा उपक्रम अमंलात आणला जाणार आहे. यातूनच गणेश विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी पालिकेने आठ गाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्यांमध्येच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांना सजावट, रोषणाई करण्यात येणार आहे. या गाड्या प्रत्येक प्रभागात जातील.

हेही वाचा- आर्थिक कमाईपेक्षा समाधानास महत्त्व देत रेवडेकर भगिनींनी जोपासलाय मूर्तिकलेचा वारसा -

त्या मुख्य ठिकाणी उभ्या राहतील व पालिकेच्या छोट्या गाड्याव्दारे या श्री गणेश मुर्ती घराघरांतून घेतल्या जातील व कृत्रिम तलाव तयार असलेल्या गाडीमध्ये आणून विसर्जन केले जाईल. या कृत्रिम तलावात निर्माल्य कळशाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शक्यतो नागरिकांनी सायंकाळी सात पर्यंत विसर्जनासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी हेल्प लाईन क्रमांक 02355 261047 48 संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी वैभव विभाते व प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी केले आहे.

संपादन - अर्चना बनगे

..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chiplun Municipality has brought an innovative concept of Ganesha immersion at your door