esakal | कोल्हापुरातील ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात जाताय! मंदिराबाबतच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?  
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur history of kolhapur siddhivinayak temple

छोट्या गाभाऱ्यात असलेली बैठी मूर्ती शेंदरी रंगाने रंगवलेली आहे.

कोल्हापुरातील ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात जाताय! मंदिराबाबतच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?  

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - शहराच्या पूर्वेस दक्षिणोत्तर वाहणाऱ्या जयंती ओढ्याच्या पश्चिाम किनाऱ्यावर सिद्धिविनायक मंदिर आहे. मुळात हे मंदिर कोल्हापूरच्या छत्रपतींचे. संस्थानच्या सेवेत असलेले ज्योतिषी बाळ जोशीराव यांनी ते बांधल्याची व तेथे गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची इतिहासात नोंद आहे.  सिद्धिविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे. 

संगमेश्वर मुक्कामी बेसावध असताना छत्रपती संभाजी महाराजांना तकरीब खान या औरंगजेबाच्या सरदाराने कैद करून कोल्हापुरात आणले. त्यानंतर तेथून दिल्लीस औरंगजेबाच्या ताब्यात दिले. संगमेश्वर येथे मुघलांच्या हल्ल्याने घबराट पसरली. मुघल सैन्याने लुटालूट सुरू केली. तेव्हा आता येथे राहणे योग्य नाही असा विचार करून बाळ जोशीराव यांनी संगमेश्वर सोडले व ते चिपळूणमार्गे साताऱ्यास वास्तव्यास आले. तेथेही ते फार काळ रमले नाहीत. अखेर त्यांनी आपला मोर्चा कर्नाटकातील चंद्रीकडे (जे जिंजी या नावानेही ओळखले जाते) वळवला. दरम्यान, कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून करवीर म्हणजेच आजच्या कोल्हापुरात केली होती. यावेळी कोल्हापूर छत्रपतींच्या राजधानीत कायमचा मुक्काम करावा असा विचार जोशीराव यांनी केला. तेव्हापासून ते संस्थानचे ज्योतिषी म्हणून कोल्हापुरातच राहिले. प्रख्यात ज्योतिषी असलेल्या जोशीराव यांची कोल्हापूर छत्रपतींचे ज्योतिषी व धर्मकार्य सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात जोशीराव यांनी कोल्हापुरात सुमारे 29 गणेश मंदिरांची स्थापना केली, त्यापैकीच एक म्हणजे ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिर. 

मंदिराची रचना 

हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला आहे. मंदिराच्या मुख्य मंडपात जाण्यासाठी पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. उमा आणि पार्वती टॉकीजच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य गाभारा सहा बाय सहा चौरस फुटांचा आहे, तर प्रवेशद्वार तीन फुटी आहे. चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मुख्य गाभाऱ्याच्या सभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिर परिसरात राधाकृष्ण, हनुमान आणि महादेव यांचीही मंदिरे आहेत. मंदिराच्या भव्य आवारात मोठे वृक्ष असल्याने भाविकांना गारवा जाणवतो. मूळ मंदिर म्हणजे सध्या असलेला मुख्य गाभाराच होता. पाऊणशे वर्षांपूर्वी ते बांधले. कोरीव कमानी हे मंडपाचे वैशिष्ट्य आहे. जुन्या काळातील मुख्य मंदिर मात्र दगडी आहे. अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न परिसर हे या मंदिराच्या वैशिष्ट्यांपैकी एक. 

हे पण वाचाया परिसरात उंदरुपीला असतो मटणाचा नैवेद्य...वाचा आगळी-वेगळी परंपरा 

प्रसन्नतेची अनुभूती देणारी मूर्ती 
छोट्या गाभाऱ्यात असलेली बैठी मूर्ती शेंदरी रंगाने रंगवलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून, उजव्या हातात परशू व दत्त तर डाव्या हातात अंकुश आणि मोदक आहे. मस्तकावर पाच फण्यांच्या शेषनागाची छाया आहे. पंचतत्त्वाचे प्रतीक म्हणूक पाच फण्यांच्या नागाची फण ओळखली जाते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या एका बाजूला बालगणेशाची मूर्ती आहे, जी वरदविनायकाचे प्रतीक मानले जाते.

हे पण वाचा"चंद्रकांतदादांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला"


संपादन- धनाजी सुर्वे