esakal | शेतात उत्पत्ती झालेला सांगलीचा हा गणपती कोणता ?
sakal

बोलून बातमी शोधा

special story of shri swayambhu ganesh murti in sangli

पाच चौरस फुटाचे हे गणेश मंदिर दहा गुंठ्यापर्यंत विस्तारले आहे

शेतात उत्पत्ती झालेला सांगलीचा हा गणपती कोणता ?

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : गेल्या वीस वर्षात मिरज, तासगाव रस्त्यावरील श्री स्वयंभू गणेश मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. हे देवस्थान नवसाला पावणारे आहे अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यांची संकष्टीला, दरवर्षीच्या गणेश जयंतीला भाविकांची गर्दी असते. संकष्टीदिवशी पहाटे सहा वाजल्यापासून रात्री आरतीपर्यंत हजारो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावतात. आरतीनंतर सुमारे साडेतीन हजार आणि गणेश जयंतीला पंधरा हजार भक्तांसाठी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पाच चौरस फुटाचे हे गणेश मंदिर दहा गुंठ्यापर्यंत विस्तारले आहे. दीड हजारहून अधिक लोक सहज सामावतील असा मंदिराचा भव्य मंडप आहे. त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा... 

हेही वाचा - एसटीमधून प्रवासाला पास नाही, खासगी वाहनातून मात्र पास, हे कुठले धोरण...

मिरज-तासगाव रस्त्यावर कवलापूर हद्दीत 1999-2000 मध्ये आप्पासो कुंभार यांच्या शेतीत ट्रॅक्ट्ररने नांगरताना एक दगड लागला. हा दगड काही शेतकऱ्यांनी काढून टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो त्या जागेवरून हालवता आला नाही. यामुळे आप्पासो कुंभार यांनी त्यांची पूजा सुरु केली आणि त्याचे स्वयंभू गणेश असे नामकरण झाले. शेतीत असलेल्या या गणपतीला लोक पाहण्यास येवू लागले. संकष्टीला आणि मंगळवारी महिलांची गर्दी होऊ लागली. यामुळे संतोष कुंभार यांनी 2009 मध्ये संकष्टीला 300 भाविकांसाठी महाप्रसाद तयार केला. सन 2013 पासून सलग महाप्रसादाची परंपरा आजवर सुरु आहे. मात्र लॉकडाऊन मधील पाच संकष्टी याला अपवाद ठरल्या. प्रत्येक संकष्टीला किमान तीन ते साडेतीन हजार भाविक आरतीनंतर महाप्रसाद घेतात. 

सध्या पुढील 18 संकष्टीसाठी महाप्रसाद घालणाऱ्या भाविकांची प्रतिक्षा यादी तयार आहे. सन 2010 मध्ये पोल्ट्री व्यवसायिक सुरेश गवळी यांनी सर्वप्रथम गणेश जयंतीला महाप्रसादाचे आयोजन केले. त्यानंतर आजपर्यंत ती परंपरा सुरु आहे. भाविकांच्या मदतीतून दरवर्षी किमान 14 ते 15 हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच वस्तु स्वरुपात मदत देण्यासाठी गर्दी केली जाते. 

हेही वाचा -  सांगली बाजार समितीत दिवसभरात 50 कोटीची उलाढाल ठप्प...

सुनिल सावंत यांच्या प्रयत्नामुळे मंदिराच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली. 2011 मध्ये 75 हजार रुपये आराखड्याच्या मंदिर उभारणीला प्रारंभ झाला. आणि त्यांच्या कंपनीचे एक काम मोठे झाल्यामुळे 3.25 लाखावर रक्कम खर्च झाली. त्यानंतर अनिक भाविकांच्या मदतीने वारंवार विकास सुरु झालेला आहे. आज 3200 चौरस फुटाचे तीन मंडपाची उभारणी झालेली आहे. 2012 मध्ये संजय वजरीणकर यांनी शिखराचे काम पूर्ण केले.
 
आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नांमुळे म्हैसाळ कालव्यावर पुल बांधल्यानंतर येथे भाविकांची सोय झाली. झेडपी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह अनेकांच्या मदतीतून हे मंदिर आकारास येत आहे. संकष्टी अन्‌ गणेश जयंतीला 100-150 विविध प्रकारचे स्टॉल येतात. त्यात काही संस्था भाविकांना रक्तदानाचेही आवाहन केले जाते. वाढता व्याप लक्षात घेवून तीन वर्षापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली असून संतोष कुंभार अध्यक्ष, गणेश माळी उपाध्यक्ष, सचिन माळी खजिनदार तर माधुरी कुंभार सचिव आहेत. या शिवाय अनेक संचालक आहेत. मंदिर उभारणीत अनेक भाविक, उद्योजकांचा समावेश आहे. भारत काटकर, प्रमोद दिंडे, सुरेश जाधव यांच्यासह अनेकांचे योगदान आहे.

संपादन - स्नेहल कदम