नंदुरबारचे जागृत देवस्थान "दंडपाणेश्वर गणपती मंदिर' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

साडे तीनशे वर्षापूर्वीचे गणेश मंदिर जागृत देवस्थान म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी कुटुंबासह काही वेळ घालविता येईल व मुलांना मनमोकळे खेळण्याचा आनंद लुटता येईल, असे गार्डन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे; तर परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनाही या मंदिरात जाण्याचा मोह आवरात येत नाही.

नंदुरबारः नंदुरबार हे बाल शहिदांची भूमी म्हणून ओळखली जात असली तरी या भूमीला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकीच दंडपाणेश्वर हे सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वीचे गणेश मंदिर जागृत देवस्थान म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी कुटुंबासह काही वेळ घालविता येईल व मुलांना मनमोकळे खेळण्याचा आनंद लुटता येईल, असे गार्डन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे; तर परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनाही या मंदिरात जाण्याचा मोह आवरात येत नाही. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. 

नंदुरबार हे नंद गवळी राजा यांची नगरी व येथे राज्याचा जनता दरबार भरत असे. त्याला नंद दरबार असे संबोधले जात असे, त्याचा अपभ्रंश होऊन नंदुरबार हे नाव पडल्याचे जाणकार सांगतात. एवढेच नव्हे तर अहिल्यादेवी होळकर, शिवाजी महाराज, बाल शहिदांची भूमी या ऐतिहासिक वारसाबरोबरच धार्मिक महत्वही आहे. शहराचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पतंगोत्सव हे राज्यभर प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवातील दादा गणपती, बाबा गणपती यांना दीडशे वर्षाची परंपरा आहे. कल्याणेश्वर महादेव, काला नंदी, खोडियार माता, डुबकेश्वर महादेव मंदिर, योगेश्वरी माता, गणपती मंदिर यासह विविध धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भाविकांचा नवसाला पावणारा व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंडपाणेश्वर मंदिर. 

ऐतिहासिक दंडपाणेश्वर मंदिर 
दंडपाणेश्वर मंदिर हे नंदुरबार शहराचा पश्‍चिमेस साक्री- नवापूर रस्त्यावर आहे. पूर्वी हे मंदिर शहराबाहेर होते. आज शहराचा मध्यवस्तीत मुख्य रस्त्यालगत आहे. पूर्वी मोकळ्या जागेत गणपती मुर्ती असल्याचे जाणकार सांगतात. मंदिराला लागून एक नाला आहे. त्याला गणपती नाला असे म्हणतात. हे मंदिर शिवकालीन आहे. याची आख्यायिका सांगताना जाणकारांनी म्हटले आहे की, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुजरातमधील सुरतचा खजिना लुटला होता. त्यावेळेस तेथून परततांना नंदनगरीचा शहराबाहेरील येथे तेव्हा असलेल्या जंगलात त्यांनी सैन्यांसह मुक्काम केला होता. त्यांनी गणेश स्थापना केली असावी. त्यानंतर 1982 मध्ये धार येथील दादा महाराज येथे आले. त्यांनी या ठिकाणी लहान मंदिर बांधून त्याचा जिर्णोध्दार केला होता. गावाबाहेर निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे व अनेक भाविकांचा नवसाला पावल्यामुळे पुढे या मंदिराचे महत्व वाढले. येथे संकष्ट चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली. 

वाणी कुटुंबीयांनी घेतला विकासाचा वसा 
या ठिकाणी असलेल्या दंडपाणेश्वर गणपतीचे भक्त असलेल्या कन्हैयालाल रावजीभाई वाणी यांनी या धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन सांभाळले. त्यांनी या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचे पुत्र अशोकभाई व किशोरभाई वाणी यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने धार्मिक व पर्यटन स्थळ विकसित केले. आज या स्थळाला परराज्यातील भाविकही भेट देतात. श्री. वाणी कुटुंबीयांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मंदिराला सभा मंडप बांधला आहे. एवढेच नव्हे, तर गरीब कुटुंबातील विवाह सोहळे येथे करता यावेत म्हणून जेवणासाठीची व भांड्यासह लग्न लावण्यासाठीची व्यवस्था करून दिली आहे. तसेच भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेता. आलेल्या भाविकांना दर्शनानंतर कुटुंबासह तास-दोन तास निवांत बसता यावे, निसर्गाच्या सांनिध्यात राहता यावे म्हणून विविध रंगी-बेरंगी फुल झाडांसह, आकर्षक वृक्षवल्लीने हा परिसर फुलविला आहे. लॉन तयार करून आकर्षक गार्डन फुलविले आहे. कुटुंबीयासह आळ्यावर मुलांना खेळण्यासाठी खेळणे, तसेच रेल्वे कार्यान्वित केली आहे. ज्याचामुळे त्या विद्युत रेल्वेत बसून कुटुंबीयांसह गार्डन फिरता येईल. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारली जाते. गार्डनमध्ये प्रवेशासाठी नाम मात्र फी आहे. मंदिराचा बाहेर धार्मिक साहित्य विक्रीसह विविध प्रकारचे चटपटीत खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने थाटलेले असता. आता दररोजची गर्दी येथे होते. गणपतीचा दर्शनासोबतच करमणुकही होत असल्याने सुट्टीचा दिवशी मोठ्या प्रमाणात हा परिसर गर्दीने फुललेला असतो. जिल्ह्यातील अनेक कुटुंब येथे येत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ganesh festival nandurbar dandpaneshwar ganpati tempal