विघ्नहारी..विघ्नहर्ता..स्वयंभू जसा...नवशा गणपतीचा ज्याचा महिमा असा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

नवशा गणपतीमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 'हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद' यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर जरी शेजारी असले तरी त्यांच्यात आजतागायत कधीही वाद झाला नाही.

नाशिक : नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. हा गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे. गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशमूर्ती आहे. या मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. 

पेशव्यांच्या कारकीर्दीची साक्ष देणारा मंदिराचा इतिहासही अनोखाच!

सन १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवली हे आजोळ होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रीत्यर्थ चांदवडसचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले. राघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकीर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे, अशी माहिती मंदिराचे गुरुजी श्री. शिवाजी बिडकर यांनी दिली.

१९९० च्या कालखंडात मंदिरात अष्टविनायकाची स्थापना

सन १९८८ मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. गोदातीरी असलेल्या मंदिरास वारंवार पुराचा तडाखा बसत असल्याने या मंदिराचा जीर्णोध्दार करणे अपरिहार्य होते. सन १९९० च्या कालखंडात संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस या मंदिरात अतिशय गर्दी असते. याप्रसंगी मंदिर प्रशासनातर्फे ५००० किलोच्या महाप्रसादाचे वाटप होते. निसर्गरम्य असलेल्या मंदिर परिसरात अभिषेक, सत्यनारायण पूजा करण्याची सुविधा संस्थेने केली आहे.

हिंदु-मुस्लीम एैक्याचे प्रतीक

नवशा गणपतीमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 'हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद' यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर जरी शेजारी असले तरी त्यांच्यात आजतागायत कधीही वाद झाला नाही. या दोन्ही संस्थांमार्फत 'रामरहिम' मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक कार्यक्रम करणारी संस्था नसून त्याद्वारे सामाजिक कार्य केले जाते. असे श्री नवशा गणपती मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

चक्क बाप्पाच्या मुखाला मास्क

नावाप्रमाणेच हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीकाठी असलेले हे देवस्थान पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. दररोज शेकडो भाविकांची मंदिरात हजेरी असते. मात्र, सध्या भाविकांची संख्या रोडावली आहे. कोरोनाची भीती वाटत असल्याने भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला असला तरी देवस्थान मात्र भाविकांचीच नव्हे तर विघ्नहर्त्या गणरायाची देखील काळजी घेताना दिसले. नाशिक शहरात गंगापूर रोडवरील आनंदवल्ली जवळ गोदावरी नदीच्या काठावर नवश्या गणपती मंदिर आहे. नावाप्रमाणेच हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीकाठी असलेले हे देवस्थान पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. दररोज शेकडो भाविकांची मंदिरात हजेरी असते. मात्र, सध्या भाविकांची संख्या रोडावली आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navshya ganapati darshan nashik marathi story