केळझरच्या टेकडीवरील श्री सिद्धिविनायक; वसिष्ठ ऋषींनी स्थापना केल्याची आख्यायिका

रुपेश खैरी
Wednesday, 26 August 2020

नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गणेश उत्सवाच्या काळात हे मंदिर केवळ सकाळ आणि सायंकाळी पूजेकरिता उघडत असल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.

वर्धा : वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथील टेकडीवरील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हे मंदिर सर्वदूर परिचित आहे. या मंदिराचा फार प्राचीन इतिहास आहे. एवढेच नाही तर हे मंदिर वसिष्ठ ऋषींनी केवळ त्यांच्या पूजेकरिता निर्माण केल्याची आख्यायिका आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणून या केळझरच्या सिद्धिविनायकाची ओळख आहे. शिवाय नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गणेश उत्सवाच्या काळात हे मंदिर केवळ सकाळ आणि सायंकाळी पूजेकरिता उघडत असल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.

रामजन्मापूर्वीचा इतिहास

वसिष्ठ पुराण आणि महाभारतात केळझर या गावाचा उल्लेख एक चक्रनगर या नावाने उल्लेख आहे. श्रीरामचंद्राचे गुरू वसिष्ठ ऋषी यांचे येथे वास्तव्य असल्याची नोंद आहे. वसिष्ठ ऋषींनी स्वत: भक्‍ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली. त्यानंतर याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा देखील उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरद विनायक असे आहे. वर्धा नदीचे नाव वरदा होते. यामुळे हे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. हा काळ श्रीराम जन्माच्या पूर्वीचा असून श्रीराम जन्मानंतर वसिष्ठ ऋषींनी येथील वास्तव्य सोडल्याची आख्यायिका आहे.

याच गावात झाला होता बकासुराचा वध

महभारतात या गावात म्हणजे एकचक्रनगरीत पांडवांचे वास्तव्य असताना बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा उल्लेख आहे. वर्धा-नागपूर मुख्य मर्गावर आग्नेय बाजूला बौद्ध विहारासमोर बकासूर राक्षसाचे मैदान तोंड्या राक्षस म्हणून प्रचलित आहे. टेकडीवरील परिसर निसर्गरम्य आहे. या टेकडीला वाकाटक काळापासून भव्य किल्ल्याचे स्वरूप आहे. या किल्ल्याला पाच बुरूज होते. माती गोट्यांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी सुंदर व भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली असून त्याला गणेश कुंड या नावाने ओळखतात. वाकाटकानंतर प्रदर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. या मंदिराला भोसले कालीन इतिहासही आहे.

मंदिरात होत असलेले उत्सव

या मंदिरात जागेश्‍वर महाराज सप्ताह साजरा साजरा करण्यात येतो. ही यात्रा तिथीनुसार साजरी करण्यात येते. गणेश चतुर्थी उत्सव प्रत्येक चतुर्थीला साजरा करण्यात येतो. याच काळात येथे महाबळा येथील नागरिकांकडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित असतो. मदिर परिसरात असलेल्या महाक्ष्मीच्या मंदिरात विजयादशमीपर्यंत उत्सव आयोजित करण्यात येतो. कार्तिक मास उत्सव, पौष संकष्टी चतुर्थीला एक दिवसाची यात्रा भरत असून हजारो भाविक येथे येतात. या मंदिरात गणेश जयंती आणि महालक्ष्मी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सोबतच गजानन महाराज प्रगटदिन उत्सव साजरा करण्यात येतो.

धमार्थ वाचनालयाची सेवा

श्रीसिद्धी विनायक गणपती देवस्थानचा परिसर हा सोळा एकरचा असून टेकडीवर श्री गणेशाचे भव्य मंदिर आहे. मंदिर परिसरात धर्मार्थ वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या मंदिरात वर्षभर नागरिकांकडून स्वयंपाक करण्याच्या दृष्टीने दोन मोठे किचन शेड तयार करण्यात आले आहे. येथे पाण्याची 24 तास व्यवस्था करण्यात आहे.

क दर्जाचे पर्यटनस्थळ

श्रीसिद्धी विनायक देवस्थानाला शासनाकडून पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. गत तीन वर्षापूर्वी या मंदिराला क दर्जाचे पर्यटन स्थळ प्रदान करण्यात आले आहे.

संपादन -  अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information about Vidarbhache Ashtvinayak kelzar ganesh