
महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याचा आनंद राज्यात सर्वत्र साजरा होत असतानाच लातूर सारख्या शहरात एक वेगळा इतिहास रचला जात होता. शहरातील गाव भागातील आझाद चौकात भारत, रत्नदीप आणि आझाद असे तीन गणेश मंडळ एकत्र आली. यातून भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची स्थापना झाली. मानाचा गणपती आणि आजोबा गणपती म्हणून या गणेश मंडळाचा नावलौकिक आहे.
भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाचा आजोबा गणपती
लातूर : महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याचा आनंद राज्यात सर्वत्र साजरा होत असतानाच लातूर सारख्या शहरात एक वेगळा इतिहास रचला जात होता. शहरातील गाव भागातील आझाद चौकात भारत, रत्नदीप आणि आझाद असे तीन गणेश मंडळ एकत्र आली. यातून भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची स्थापना झाली. मानाचा गणपती आणि आजोबा गणपती म्हणून या गणेश मंडळाचा नावलौकिक आहे.
आजोबा गणपती पडले नाव
लातूरमध्ये पूर्वीपासूनच गणेशोत्वस मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे. पण पूर्वी वेगवेगळ्या मंदिर, मठातच गणरायाची स्थापना केली जात होती. येथील आझाद चौकात देखील भारत, रत्नदीप आणि आझाद हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी विघ्नहर्त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करीत होते. यात तत्कालीन सिद्रामप्पा मलंग, गंगाधरप्पा कोरे, मन्मथ कपनुरे, आबा तोडकरी, नारायण कोरे, विश्वंभर पुरी, सिद्राम पोपडे, बस्वराजप्पा पंचाक्षरी, तुकाराम साठे, गंपूप्पा खानापूरे, के. एस. वारद, बाबुप्पा उपासे, दिलीप शिवणगीकर, नागनाथ स्वामी या त्यावेळेसच्या युवकाचा सहभाग होता. माजी नगराध्यक्ष तम्मनप्पा उटगे यांना ही बाब कोठे तरी खटकत होती. त्यामुळे त्यांनी सर्वांना एकत्र केले. १९६१ मध्ये या सर्वामध्ये समन्वय साधत भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची स्थापना केली. शहरात रस्त्यावर येवून एखाद्या चौकात स्थापना केला जाणारा हा पहिलाच गणपती ठरला. त्यामुळे या गणपतीला आजोबा गणपतीही असे नावही दिले गेले.
वैचारिक बांधिलकीची जोपासना
या मंडळाचे कार्यकर्ते एका विचाराने बांधले गेले होते. त्यामुळे सुरवातीच्या काळात १९६३ ते १९६८ या कालावधीत थोर साहित्यीक विचारवंत, समिक्षक नरहर कुरुंदकर यांची बौद्धीक व्याख्याने त्यांनी घेतली. ज्येष्ठ पत्रकार रंगा वैद्य, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्या प्रभाताई झाडबुके, डॉ. ना. य. डोळे, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, प्रा. भूजंग वाडीकर, कवी प्रभंजन यांच्या व्याख्यानातून प्रबोधन घडवून आणले. किर्तनकार करंदीकुर बुवा, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायक मालिनी राजूरकर, मारी पानसे, नंदकुमार भातलवंडे, बीदरचे न्हने बाबू आदींचे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या मंडळाने लातूरकरांना दिली.
मंडळाला विसर्जन मिरवणुकीचा मान
या मंडळाने १९६८ ते १९७५ या कालावधीत काळाप्रमाणे आपल्या कार्यक्रमात बदल केला. बुद्धीबळ, रांगोळी, फॅशन, धावणे, सायकलिंग अशा विविध स्पर्धा घेत तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला. श्री ची स्थापना आणि विसर्जनच्या वेळी मिरवणुकीची प्रथा सुरु केली. यात शिस्त व शांतता आणण्यासाठी १९६२ मध्ये तत्कालीन एएसपी व्यंकटाचलम राव यांनी भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाला विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान दिला आणि त्यावेळेसपासून विसर्जन मिरवणुकीच्या मानाचा गपणती म्हणून या गणेश मंडळाची ओळख झाली. इतकेच नव्हे तर दरवर्षी पोलिस अधिक्षकांच्या हस्ते या मंडळाच्या गणरायाची पूजा केल्या शिवाय विसर्जन मिरवणुकच सुरु होत नाही. या मंडळाचे वैशिष्टे म्हणजे आजोबा, वडिल आणि नातू अशा तीन पिढ्या मिरवणुकीत सहभागी होतात. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत समाज प्रबोधन करणारी एखादी वीस फुटाचा देखावा हे या मंडळाचे आणखी एक वैशिष्टे राहिले आहे.
देखावे सुरु करणारे मंडळ
मानाचा गणपती असलेल्या या मंडळाल आणखी एक इतिहास आहे. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी गणेशोत्सवात देखाव्याना महत्व आहे. हे पाहून मंडळाने शहरात पहिल्यांदा देखाव्याची सुरवात केली. लालकिल्ला, सुवर्णमंदिर, खुजराहो मंदिर, म्हैसूर पॅलेस असे अनेक देखावे त्यांनी केले. यासोबतच भारत जोडो, मशाल यात्रा अशा प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. तसेच कारगील युद्ध, १८५७ चा क्रांतीकारी उठाव, द्रौपदी वस्त्राहरण असे अनेक जीवंत देखावे लातूरकरांसमोर सादर केले.
मंडळाचे स्वतःचे सभागृह
गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करीत असताना या मंडळाच्या पदाधिकाऱयांनी आझाद चौकातच एक जागा घेतली. त्या ठिकाणी तीन मजली सभागृह बांधले. याकरीता तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख यांनी देखील आपल्या आमदार निधीतून या सभागृहासाठी काही निधीही उपलब्ध करून दिला. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाने उभी केलेली ही पहिलीच वास्तू ठरली. या भागातील लहान कार्यक्रमासाठी तीचा उपयोग ठरू लागला आहे.
सतत अठरा वर्ष एकच अध्यक्ष
एखादे गणेश मंडळ नावारुपाला आले की अध्यक्ष होण्यासाठी पदाधिकाऱय़ात चढाओढ लागलेली असते. पण त्याला हे मंडळ अपवाद ठरले. २०१० पर्यंत सलग १८ वर्ष सिद्रामप्पा पोपडे हेच या मंडळाचे अध्यक्ष राहिले. मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे झाल्यानंतर त्यांनी तरुणांच्या हातात मंडळ दिले. या मंडळाने राजा मणियार, भिमा बेंबळकर, मुस्तफा घंटे, व्यंकटेश पुरी, जीवन शेटे, उमाकांत कोरे असे अनेक सामाजिक कार्यकर्तेही लातूरला दिली आहेत.
( संबंधित लेख याआधी प्रसिद्ध झाला होता. गणेशोत्सवानिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)