esakal | मूर्ती संकलन केंद्रांमुळे शहरात शिस्तीने, गर्दी टाळून झाले गणेश विसर्जन 
sakal

बोलून बातमी शोधा

Visarjan

शहरामध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जनाची धावपळ सुरू झाली. सोलापूर महापालिकेने विविध झोनमध्ये मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. या केंद्रांवर गणेशभक्त बच्चेकंपनीसह गणेश मूर्ती घेऊन येत होते. या ठिकाणी आल्यानंतर केंद्राच्या ठिकाणी गणेशाची पूजा करून मूर्ती संकलित केली जात होती. शाळा, समाजमंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणच्या या केंद्रांमध्ये काळजीपूर्वक मूर्ती साठविण्यात आल्या. 

मूर्ती संकलन केंद्रांमुळे शहरात शिस्तीने, गर्दी टाळून झाले गणेश विसर्जन 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शहरामध्ये महापालिकेने उपलब्ध केलेल्या मूर्ती संकलन केंद्रांच्या माध्यमातून गणेश विसर्जनाचा सोहळा अत्यंत शिस्तीने व सर्व प्रकारची गर्दी टाळत साजरा करण्यात आला. मूर्ती संकलन या योजनेमुळे सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी एकाही गणेशमूर्तीचे विसर्जन झाले नाही. 

शहरामध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जनाची धावपळ सुरू झाली. सोलापूर महापालिकेने विविध झोनमध्ये मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. या केंद्रांवर गणेशभक्त बच्चेकंपनीसह गणेश मूर्ती घेऊन येत होते. या ठिकाणी आल्यानंतर केंद्राच्या ठिकाणी गणेशाची पूजा करून मूर्ती संकलित केली जात होती. शाळा, समाजमंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणच्या या केंद्रांमध्ये काळजीपूर्वक मूर्ती साठविण्यात आल्या. दिवसभर प्रत्येक नागरिक स्वतंत्रपणे येऊन मूर्ती केंद्राला देत होता. बाजारपेठेत मूर्ती विसर्जनाची गर्दी त्यामुळे संपली. प्रत्येक वसाहतीमध्ये काही मीटरच्या अंतरावर ही मूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली होती. 

आजोबा गणपती या मानाच्या गणपती मंदिरावर अनंत चतुर्दशी निमित्त सकाळपासून भाविक दर्शन घेत होते. शहरामध्ये कावेरी विसर्जन कुंड, भीमा विसर्जन कुंड अशा विविध नावांनी सजवलेल्या ट्रॅक्‍टरमध्ये मूर्ती संकलन करण्यात येत होते. मानाच्या आजोबा गणपती मंदिरासमोर विसर्जन कुंड स्थापन करण्यात आला होता. 
महापालिकेने केलेल्या सोयीमुळे सिद्धेश्वर तलावावर असलेल्या गणेश विसर्जन ठिकाणी कोणीही मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेले नाहीत. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवून हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला होता. विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेल्या गणेश मंदिरावर मात्र भाविक दर्शनासाठी आले होते. शहरातील विविध मंडळांनी देखील अत्यंत शिस्तीने गणेशमूर्तींचे विसर्जन दिलेल्या सूचनांनुसार केले. यावर्षी सर्व यंत्रणांनी मिळून केलेल्या कामगिरीने गणेश विसर्जनाची गर्दी बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली होती. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने घरोघरी गणेश पाठ, अथर्वशीर्ष आणि इतरही धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील विविध गणेश मंदिरे आणि ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक मंदिरांमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. शहरामध्ये सर्वत्र विसर्जनाच्या पारंपरिक ठिकाणी पोलिसांनी लोकांना येण्यास मज्जाव करत बंदोबस्त लावला होता. 

अनेक मंडळे आणि नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन केले. विशेषतः ज्यांनी शाडूची मूर्ती स्थापन केली होती त्यांनी घरीच पाण्याच्या भांड्यांमध्ये या मातीच्या मूर्तीचे विसर्जन केले. या वर्षी शाडू मूर्तीच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली होती. विसर्जनाच्या अडचणी आणि कोरोना संकट यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीला सर्वांत अधिक प्राधान्य दिले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top