esakal | नवसाला पावणारा हिंगोलीचा चिंतामणी गणपती, भाविकांकडून मोदक वाटपाची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli News

दरमहा चतुर्थीला चितामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यात गणेशोत्सवाच्या काळात मोठी भर पडते. चिंतामणी गणेश भाविकांच्या हाकेला धावून जातो. नवस पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

नवसाला पावणारा हिंगोलीचा चिंतामणी गणपती, भाविकांकडून मोदक वाटपाची परंपरा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील गोड्डीपीर भागातील चिंतामणी गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभरासह  पंजाब आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये ओळख आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला लाखो भाषिक नवसाचे मोदक घेऊन दाखल होतात.

दरमहा चतुर्थीला चितामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यात गणेशोत्सवाच्या काळात मोठी भर पडते. चिंतामणी गणेश भाविकांच्या हाकेला धावून जातो. नवस पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे दरवर्षी अनंत चतुर्दशीला मोदक वाहण्यासाठी मोठी गर्दी होते. यात १०८ पासून १००८ मोदकांचा प्रसाद भाविक वाटप करतात. ज्या भाविकांनी नवस बोलला ते भाविक चिंतामणीजवळील मोदक घरी नेऊन त्याची वर्षभर पूजा करतात. एका बंद डब्यात ठेवून त्याची पूजा केली जाते व नवस फेडण्यासाठी हे मोदक अनंत चतुर्दशीला आणले जातात. महापूजेनंतर त्याचे वाटप केले जाते. यासाठी शहरासह परभणी, नांदेड, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर, अकोला, यवतमाळ आदी शहरांसह पंजाब, आंध प्रेदश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील भाविक येथे दाखल होतात. 

हेही वाचा - Video - वझरा शेख फरीद धबधबा पर्यटकांविनाच कोसळतोय, कुठे ते वाचाच

या दिवशी येथे सकाळी अकरा वाजता कयाधू नदीवर कावड घेऊन २५ ते ३० भाविक जातात. कावडीने पाणी आणून चिंतामणी गणेशाचा अभिषेक केला जातो व त्यानंतर दुपारी चार वाजता महापूजा करून पाच वाजता महाआरती होते. त्यानंतर नवासाच्या मोदकाचे वाटप केले जाते. यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने सकाळपासूनच शहरातील सर्व वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात येतात. वाहनासाठी शहराबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. बाहेरगावच्या भाविकांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था भाविकांतर्फे मोफत करण्यात येते. यासाठी रमाकांत मिस्कीन, बंद्री मुंदडा, अनिल वीरकर, दिलीप बांगर, प्रेम जैस्वाल, कृष्ण मुरारी मंत्री, विजय धानमणे, गजानन पाटोळे व त्यांचे सहकारी पुढाकार घेतात.

हेही वाचलेच पाहिजे - Video : नांदेडमध्ये आहे जुन्या गाण्यांवर व्यक्त होणारा अंगत-पंगत कार्यक्रम

रमाकांत मिस्किन हे दरवर्षी एक हजार वाढीव मोदक वाटप करतात. मागच्या वर्षी त्यांनी ४१ हजार मोदक वाटप केले आहेत. अनंत चतुर्दशीला नवसाचे मोदक घेऊन येणारे भाविक दरवर्षी मोदकाची संख्या वाढवितात. तर गणपतीजवळ व शहरात विविध ठिकाणी असणारे भाविक रमाकांत मिस्कीन यांना नवसाचे मोदक तयार करण्यास मदत करतात. 

गणेशोत्सवात दहा दिवस भाविकांची मोठी गर्दी असते. अनंत चतुर्थीला शहरात येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेपर्यत नेण्यासाठी आॅटो संघटनेतर्फे मोफत व्यवस्था केली जाते. तर दर्शन रांगेसह शहरात विविध ठिकाणी भाविकांच्या चहा, पाणी व नास्त्याची व्यवस्था केली जाते. पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. तसेच स्वयंसेवक, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील भाविकांच्या सेवेसाठी दिवसभर येथे कार्यरत असतात.

येथे क्लिक कराच - हिंगोलीने मिळविला देशभरात मान, पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार वितरण

या दिवसी भाविकांची वाढती संख्या, शहरात जागोजागी असलेले दर्शन रांगेचे बँरिकेट पाहता बाजारपेठ बंद ठेवली जाते. तसेच पालिका प्रशासनातर्फे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. जागोजागी घंटागाडी व कर्मचारी उभे असतात. आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील जागोजागी तैनात असतात. रुग्णवाहिका देखील उभीच असते. यासह दर्शन रांगेत एलसीडीची व्यवस्था करून मंदिरात होणारे कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था केली जाते. तसेच स्पीकरवर भाविकांना सुचना देण्याचे काम सुरू असते रात्री बारापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा कायम असतात. अनंत चतुर्थीला लाखो भाविक विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन मोदकोत्सवात सहभागी होतात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे अडचणी आल्या आहेत.