
ओंकार प्रधान रूप गणेशाचे कळे तिन्ही काळाचे आत्मज्ञान
आपल्या हिंदू धर्मियांच्या सण व उत्सवाचे स्वरूप धार्मिक आहे. सर्वांनी आनंद घ्यावा व द्यावा, निसर्ग आणि कला यांचा रस घ्यावा, तसेच आपले जीवन समृद्ध करावे हा सण उत्सव निर्मितीमागचा ऋषिमुनींचा हेतू दिसून येतो. देवदेवतांना सांघिक सुखाचा अनुभव मिळावा म्हणून ओंकाराने पृथ्वी निर्माण केली. तेव्हा उत्सवाचा शुभारंभ यज्ञ-यागातून केला गेला, असे सांगितले जाते. सण उत्सवाची मुहूर्तमेढ त्या वेळी रोवली गेली असे समजतात. सण व उत्सव समारंभांचा आदिदेव ॐकार गणेश आहे. म्हणून मंगलप्रसंगी गणेशाचे पूजन केले जाते. श्री गणेश सुखकर्ता, विद्या- वैभवदाता असा आहे.