Ganesh Visarjan 2022 : विसर्जनाच्या योग्य विधीतून पसरेल चैतन्याचा प्रवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Visarjan 2022

Ganesh Visarjan 2022 : विसर्जनाच्या योग्य विधीतून पसरेल चैतन्याचा प्रवाह

नागपूर : अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळात केलेल्या शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य समाविष्ट होते. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे हे चैतन्य प्रवाहातून सर्वदूर आणि बाष्पीभवनातून वातावरणातही पोहचते. त्यामुळे योग्य विधीनुसारच विसर्जन होणे आवश्यक आहे, असे दाखले शास्त्रात दिल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

भद्रा शुक्ल चतुर्थीपासून गणेश पूजेची सुरुवात केल्यानंतर चतुर्दशी तिथीला गणपती विसर्जनाचा नियम शास्त्रात सांगितला आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि गणपती विसर्जन केले जाते.

विसर्जनाचा मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशी तिथीलाही भगवान विष्णूची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी गुरूवारी रात्री ०९.०२ वाजता सुरू झाली. शुक्रवारी (ता. ०९) सायंकाळी ६.०७ वाजता ही तिथी संपेल.

सकाळी : ६.०३ वाजेपासून १०.४४ वाजेपर्यंत

दुपारी : १२. १८ वाजेपासून १.५२ वाजेपर्यंत

सायंकाळी : ५ वाजेपासून सायंकाळी ६.३१ वाजेपर्यंत

वाहत्या पाण्यातच विसर्जन का?

अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळात केलेल्या शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. पाण्यात विसर्जन केल्याने मूर्तीतील चैतन्य पाण्याद्वारे आसमंतात पसरते. पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हे चैतन्य वातावरणाद्वारेही दूरपर्यंत पोहचते.

वाहते पाणी नसल्यास?

 • उत्तरपूजेनंतर मूर्ती घराबाहेर तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात किंवा शहरात सदनिकात वास्तव्य करणाऱ्यांनी घरातच भांड्यात पाणी घेऊन त्यात विसर्जित करावी.

 • मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.

 • मोठी मूर्ती असल्यास त्या मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर ती घरातच सात्त्विक ठिकाणी (उदा. देवघराच्या शेजारी) ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये, यासाठी ती एखाद्या खोक्यात झाकून ठेवावी. पुढे वहाते पाणी उपलब्ध झाल्यानंतर ही मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. त्यामुळे चैतन्य वातावरणात पसरण्यास मदत होईल.

आपापल्या कुळानुसार व पद्धतीनुसार विसर्जनाचा दिवस ठरलेला असतो. त्यानुसार विसर्जन केले जाते. मूर्ती विसर्जित करताना मूर्तीचे तोंड आपल्याकडे न ठेवता विहीर, तलावाच्या दिशेने ठेवावे.

-प्रीती राजंदेकर, पंचागकर्त्या, धनलक्ष्मी पंचांग

विसर्जनापूर्वी आणि विसर्जनाच्यावेळी..

 • पूजा केल्यानंतर, आरती करा आणि क्षमासाठी प्रार्थना करा

 • गूळ, ऊस, मोदक, केळी, नारळ, पान आणि सुपारी अर्पण करा

 • गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा आणि घरात सुख शांती असू द्यावी अशी प्रार्थना करा

 • गणेशजींना नवीन कपडे घालणे, पंचमेवा, जिरे, सुपारी आणि त्यात काही पैसे बांधणे

 • मूर्तीला नमन, नंतर पायाला स्पर्श, नंतर परवानगी घेत श्रद्धेने मूर्ती उचला

 • मूर्ती मोठी असेल तर ती बाहेर नदी, तलाव किंवा समुद्रात विसर्जित करा

 • विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा. आपल्या समोर तोंड करून विसर्जन करू नका

 • विसर्जनाच्या वेळी बाप्पाचा जयघोष करा आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत गणरायाला निरोप द्या

विसर्जन का? काय आहे आख्यायिका?

१० दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीला विसर्जनानंतर संपतो. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेदव्यास यांच्या सांगण्यावरून गणपतीने महाभारत साध्या भाषेत लिहिले. गणपतीने गणेश चतुर्थीपासून हे काम सुरू केले आणि न थांबता १० दिवस लिहीत राहिले. जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणेशजींच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्या ने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.

मातीचीच मूर्ती का?

सध्या ‘इको फ्रेंडली’ म्हणून कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवतात. हा प्रकार अशास्त्रीय आहेच, तसेच पर्यावरणालाही हानिकारक आहे. कारण, कागदाचा लगदा पाण्यातील प्राणवायू शोषून घेतो आणि त्यातून जीवसृष्टीला हानिकारक अशा ‘मिथेन’ वायूची निर्मिती होते. धर्मशास्त्रानुसार मातीची मूर्ती बनवणे, हेच खरे पर्यावरणप्रेम आहे.

विदर्भासह कोकण, मराठवाडा, खानदेश अशा विविध भागात विसर्जनाच्या पद्धती वेग-वेगळ्या आहेत. प्रामुख्याने विसर्जनाच्या वेळी दही-पोहे, ओली दाळ, काकडी, सफरचंद याचा नैवेद्य गणपतीला दाखविला जातो. विसर्जनस्थळी करण्यात येणाऱ्या पूजेला उत्तरपूजा असे म्हणत असून वाद्य वाजवित दोनदा मूर्ती पाण्यात सोडावी व विसर्जन करावे. स्थापनेची जागा लागलीच रिकामी न करता याठिकाणी कलश, पंचाग ठेवावे.

-अनिल वैद्य, सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य

Web Title: Ganesh Visarjan 2022 Ganesh Festival Idol Worshiop Ritual

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..