esakal | हे गणेशा, तू भक्ती घेऊन ये, जीवनावर उजेडाची फुले उधळत ये 
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

मूर्ती सुबक सुंदर असावी म्हणून मूर्तीकाराकडून आणू लागलो. हे चिंतामणी, तुझ्या आगमनाच्या निमित्ताने सर्व वातावरण आनंदी, उत्साही असते. त्यामुळे आम्ही रोजच्या चिंता, दु:ख विसरतो.. 

हे गणेशा, तू भक्ती घेऊन ये, जीवनावर उजेडाची फुले उधळत ये 

sakal_logo
By
संतोष शेणई

हे मंगलमूर्ती श्रीगणराया, अवघा महाराष्ट्र तुझे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. तू सकल मंगलाचा निर्माता, तुझी मांगल्यसूचक मूर्ती आता दहा दिवस प्रत्येकाच्या नजरेसमोर असेल, मनात असेल. तुझ्या या रूपाकडे पाहत ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत भक्तीचा जागर करीत राहू आम्ही सारेजण आणि आमच्या हृदयातून आनंदाचा सागर उचंबळत राहील. अवघा महाराष्ट्र दरवर्षी ज्या उत्कटतेने गणेशोपासना करतो, त्या उत्कटतेत कोरोनाच्या संकटानेही तसूभर कमी होणार नाही. हे विघ्नहरा, कोरोनाचे विघ्नही तूच दूर करशील असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत अनेक मर्यादा येऊनही महानगरातील महाल आणि गावशिवारातील चंद्रमौळी झोपड्या सारख्याच श्रद्धेने, भक्तीने, उत्साहाने आणि आनंदाने तुझ्या स्वागताला सज्ज झाले आहेत. हे बाप्पा, आमच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील मांगल्याची प्रेरणा तुझ्याच उपासनेत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गणेश चतुर्थी हा एक व्रतोत्सव आहे. ‘वरद चतुर्थी’ म्हणूनही हे व्रत ओळखले जाते. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी व्रत येथे मोठ्या प्रमाणात केले जाते. खरे तर, स्वत: आपल्या हाताने मातीचा गणपती तयार केला पाहिजे, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. तसेच या मूर्तीची माध्यान्हकाळी पूजा करून, नैवेद्य दाखवून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करावे, असा उल्लेख पार्थिव गणेशोत्सव व्रतामध्ये आढळतो. पूर्वी तशीच प्रथा होती. पण पुढे काळाच्या ओघात हे बदलले. मूर्ती सुबक सुंदर असावी म्हणून मूर्तीकाराकडून आणू लागलो. हे चिंतामणी, तुझ्या आगमनाच्या निमित्ताने सर्व वातावरण आनंदी, उत्साही असते. त्यामुळे आम्ही रोजच्या चिंता, दु:ख विसरतो. म्हणून उत्सवप्रिय समाजाने गणपतीचे विसर्जन त्याच दिवशी न करता तो किमान दीड दिवस तरी ठेवावा, अशी पद्धत सुरू केली. पुढे हळूहळू दीडवरून पाच, सात असे करत अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसविण्याची पद्धत सुरू झाली. वैयक्तिक पातळीवर अजूनही कित्येकजण दीड दिवसांनी बाप्पांना निरोप देतात, ते यंदाही तसेच करतील. पण गणनायका, सामूहिक पातळीवर ही आनंदयात्रा दहा दिवस फुलतच राहील.

Video : प्राण-प्रतिष्ठापना |गणेश पूजन । गणेशोत्सव २०२०

हे ब्रह्मणस्पती, महाराष्ट्र ही गणेशभक्तांची पुराणकालापासून तपोभूमी आहे. येथील अष्टविनायक आम्हा भक्तांच्या साधनापूर्तीची स्थाने आहेत. शतकानुशतके जीवनातील सर्व शुभ कार्ये मंगलदात्याच्या पूजनाने सुरू करीत आलो आहोत. आमच्या जीवनशिक्षणाचा पहिला पाठच ‘श्रीगणेशाय नमः’ हा आहे. सामाजिक-राजकीय जीवनाचा पहिला पाठही तुझ्या साक्षीने गणेशोत्सवाच्या मंडपातच गिरवला जातो. हे गुणिना, यावेळी या गोष्टींना बाधा आहे कोरोनाची. पण तुझ्या आशीर्वादाने आम्ही त्यावरही पर्याय शोधले आहेत. हे बुद्धीदात्या, तूच तर योग्य कृती करण्याची बुद्धी देत आहेस. तुज शंभवी म्हणो की रुद्रप्रिय! ऋग्वेदातील तेजस्वी आणि मनस्वी असा तू पुराणकालात शिव-शक्तीचा पुत्र बनून गजाननरूप पावलास. गणांचा अधिपती बनलास. ‘सुखकर्ता’ अन् ‘दुःखहर्ता’ झालास. तुझे मंगलरूप प्रत्येकाच्या भावविश्‍वात सहज मिसळत गेले रे, सुमुखा. तू ‘सकलमति प्रकाशु’ आहेस. ‘ज्याच्या अंतःस्थ तेजाने अग्नी प्रज्वळतो, सूर्य प्रकाशतो आणि हे विराट विश्‍व उजळून जाते, त्या गणेशाने आमचे जीवनही प्रसन्न आणि प्रकाशमय करावे,’ ही भारद्वाज ऋषींची प्रार्थना, हे अवनिशा तू आजही ऐकतोस आणि येथील मने उजळावीत म्हणून दहा दिवसांच्या उत्सवासाठी अवतरणार आहेस. हे कविशा, तू भक्ती घेऊन ये, संस्कृती नटवत ये, कला-साहित्य आदी जीवनावर उजेडाची फुले उधळत ये. आजच्या जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था हा कळीचा शब्द बनला आहे. या अर्थव्यवस्थेचे आदिबीज असलेल्या सर्जनशीलतेचे महत्त्व जगाने ओळखले आहे. कला-विद्येचा अधिपती असलेल्या तू बदलत्या प्रत्येक काळात सर्जनाला, नावीन्याला प्रेरणा दिलेली आहेस, म्हणूनच प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण करू पाहण्याच्या काळातही तुझे मंगलरूप सर्वांना भावते. ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ असा अद्वैताच्या उद्‌घोषाच्या अभिषेकाने तुझे आनंददायी रूप सर्वांच्या मनातही संतोष पेरते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे भूपती, भागवत परंपरेशी संपूर्ण समरसता साधणाऱ्या या भूमीत समन्वयशील व उदारमनस्क प्रकृतीचे प्रत्यंतर तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने घडते. त्यामुळेच सर्व जातीजमातीतील भेदाभेद विसरून सारे जण या दहा दिवसांच्या आनंदयात्रेत सामील झालेले दिसतील. सर्वसामान्य माणूस आपल्या काळजातील आरतीला वाट मोकळी करून देईल. जगण्या-मरण्याच्या लढाईतही त्याला ऊर्जा मिळवण्याचे स्थान तुझा उत्सवच असेल, बाप्पा. या उर्जेतूनच नव्या ऊर्मींनी आम्ही उभे राहू. सुखामागून दुःख व दुःखामागून पुन्हा सुख ही जीवनरहाटी सुरूच राहील. कोरोना नष्ट होईल आणि पुन्हा एकदा एकमेकांची उजळलेली मुखे पाहता येतील, महागाईच्या चटक्‍यांनतर कधी तरी पुन्हा सुखाची भाकर मिळेल, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले, पण हे चिंतामणी तुझ्या कृपेने लवकरच हे चक्र बदलेल याची खात्री आहे. जीवनातील मांगल्यावर असीम श्रद्धा ठेवणे, हाच तुझा प्रसाद आहे. दहशतीचे बाँब आसपास फुटत आहेत, याकडे दुर्लक्ष करायला नको; पण त्याच वेळी अमंगलाचा, असत्याचा, असुंदराचा निरास करून जीवनाला सत्य-शिव-सुंदराचे त्रिवेणीतीर्थ बनवण्याचे सामर्थ्य तुझ्यावरील आमच्या श्रद्धेत आहे, हे आम्ही जाणतो. व्यक्तिजीवन वेगळे व समाजजीवन वेगळे असा भेदाभेद व्यर्थ आहे. आपल्या जीवनात सत्य-शिवाचा साक्षात्कार घडवण्यासाठी आसपासचा काळोख मिटवण्यासाठी प्रत्येकाने समईत तेल घालायला हवे. उपाशी पोटांपर्यंत ‘श्रीं’चा नैवेद्य पोचवू शकतो. शेतकऱ्यांच्या जगण्याचे श्‍वास दोरीवर लटकण्यापासून थांबवायला हवेत. शाळेतून हद्दपार होणाऱ्या, ऑनलाइन अभ्यासाला मुकणाऱ्या मुलांच्या हाती विद्यानिधीचा प्रसाद ठेवायला हवा. जन्मण्याआधीच कळ्या खुडून मंगलमूर्तींची पूजा करता येत नाही, हे असमंजस मातापित्यांना समजावून द्यायला हवे, हे सारे घडले तरच आपला भवताल सुंदर होऊन जाईल, हे समजावून सांगण्याची प्रेरणा तूच आहेस. ‘जनताजनार्दनात मीच आहे’ असे भगवंता तूच सांगितले आहेस. जननायका, तुझी पूजा जनसेवेनेही बांधता येते. सामाजिक बंध जपण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षणी झाला पाहिजे. त्यासाठी आपले हात कधीही कटुतेने भरलेले असणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. पाताळाचा वेध घेणाऱ्या आणि सदैव विनम्र होऊन राहणाऱ्या दूर्वा तुझ्या आवडत्या पूजाद्रव्यांपैकी एक आहेत. या दूर्वांप्रमाणेच जगण्याचा जीवनपाठ प्रत्येकाने गिरवला तर वैयक्तिक जीवनात सौख्यसमाधान आणि सामाजिक जीवनात मांगल्य येईल, हेही जाणतो आम्ही. हे गणांच्या अधिपती, कवींच्या कवी, ज्ञात्यांच्या ज्ञात्या, कीर्तिवंतांतील वरिष्ठा आणि राजपुरुषांतील ज्येष्ठा, तुला ऋषी गृत्समदासारखेच आवाहन करतो आम्ही ः ‘हे ब्रह्मणस्पते, तुला आम्ही आदराने आवाहन करीत आहोत. तू आपल्या सर्व शक्तींसह ये आणि या आसनावर विराजमान हो.

go to top