गणपतीपुळे पंचक्रोशीत ५०० वर्षांपासून एक गणपती प्रथा

राजेश कळंबटे
Tuesday, 3 September 2019

रत्नागिरी - स्वयंभू म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेसह आजूबाजूच्या सात गावांमध्ये घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरात जाऊन पूजा - अर्चा केली जाते. ही परंपरा ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे.

रत्नागिरी - स्वयंभू म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेसह आजूबाजूच्या सात गावांमध्ये घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरात जाऊन पूजा - अर्चा केली जाते. ही परंपरा ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. गणपतीपुळ्याच्या देवळातला गणपती हा आपल्या घरात आणला जाणारा गणपती असल्याचे येथील प्रत्येकजण मानतो. गणपतीपुळे हे गणपतीचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना घराघरात करतात, अपवाद गणपतीपुळ्याचा. राज्यात अडीचशे ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना आहे. ही संकल्पना परंपरेने पाचशे वर्षांपूर्वीपासून गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळे, वरवडे, नेवरे, निवेंडी, भगवतीनगर या सात गावांत सुरू आहे. कुठल्याच घरात गणपती आणला जात नाही. या गावातील प्रत्येक घरात मोदकांचा नैवेद्य करून तो  गणपतीपुळ्याच्या देवळात नेऊन दाखवला जातो. एकमेकांच्या घरातले नैवेद्य तेथे वाटला जातो. काही लोक मंदिरातील तीर्थ घरी नेऊन त्याची पूजा करतात; प्रथेप्रमाणे गौरी आणतात. तांब्यामध्ये गौरीचा विशिष्ट फुलोरा आणून त्याचे पूजन होते. विहिरीवरील खडे आणून त्यांचे गौरी-गणपती विसर्जनादिवशी विसर्जन करण्यात येते.

...अशी आहे गणपतीची कथा
हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्‍चिमद्वार देवता म्हणून ओळखली जाते. मोगलाईच्या काळात (सुमारे इ. स. १६०० च्या पूर्वी ) या स्वयंभू गणेश मंदिराचे संदर्भ आढळतात. लंबोदर नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन, असा निश्‍चय करून त्यांनी मंगलमूर्तीची उपासना सुरू केली. त्यांना दृष्टांत झाला. गणपतीपुळे मंदिराचा डोंगर रूपात आगरगुळे (गणेशगुळे) येथील दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण केलेला गणपती आहे. त्यानंतर भिडे यांची दूध न देणारी गाय डोंगरावरील एका शिळेवर दुधाचा अभिषेक करताना आढळली. त्या परिसराची सफाई केल्यानंतर दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्यानंतर छोटेसे मंदिर उभारण्यात आले. तेथून गणपतीपुळे हे नाव पडले.

स्पर्श दर्शनाचा आनंद
गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील प्रत्येकाला देवळातील गणेशमूर्तीजवळ जाऊन दर्शन घेण्याची संधी असते. घरात गणपती आणला जात नसल्याने देवळातील गणपती हाच घरातील मानून मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेतात, त्याला स्पर्श दर्शन म्हटले जाते.

जुन्या पिढ्यांपासून ही परंपरा चालत आली असून, सर्व समाजातील लोक त्याचा अवलंब करत आहेत.
- डॉ. विवेक भिडे,
सरपंच, गणपतीपुळे देवस्थान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Ganesh Puja tradition in Ganapatipule panchkroshi