गणेशोत्सव2019 : वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

सांगता मिरवणुकांची वेळ तासांमध्ये
२४ - मुंबई
२३.५३ - पुणे
२० - कोल्हापूर
११ - सांगली
१८ - सातारा
२० - कऱ्हाड
१२ - नाशिक
१६ - सोलापूर
१८ - जळगाव

गणेशोत्सव2019 : मुंबई/ पुणे - पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणांवर गणेश विसर्जन करताना अठरा जण मरण पावल्याचे वृत्त आहे.

पुणे-मुंबईप्रमाणेच ओल्या दुष्काळाचा फटका बसलेला कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा परिसर, तसेच कोरड्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यामध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

बळिराजावरील संकट दूर कर, राज्यातील दुष्काळ सरू दे, असे साकडेही या वेळी गणरायाला घालण्यात आले. बॅंड, डीजेचा दणदणाट आणि पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. स्त्रियांप्रमाणेच आबालवृद्धांनीही मिरवणुकांत उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मिरवणुकांमध्ये सहभागी होत पारंपरिक वाद्य वादनाचा आनंद लुटला.

मुंबईत शेवटच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईत विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता विविध ठिकाणांवर ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच महत्त्वाच्या स्थळांवर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात आला होता. विविध समुद्रकिनारे आणि तलावांवर २३ हजारांपेक्षाही अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यामध्येही मुंबईप्रमाणेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बारा जण मरण पावल्याची भीती
राज्यभरात विविध ठिकाणांवर गणेश विसर्जनप्रसंगी बुडून बारा जण मरण पावले. रत्नागिरीमध्ये तिघेजण, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात प्रत्येकी दोघेजण तर धुळे, बुलडाणा आणि भंडाऱ्यामध्ये एक वाहून गेल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अन्य सहा बेपत्ता असल्याने, तेही मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Time