गणेशोत्सव2019 : दशभूजा मूर्तीतून आगळेपण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेल्या गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम ट्रस्टच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे या वर्षी अमृतमहोत्सवी वर्ष आहे. मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते. महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाची विसर्जन मिरवणूक अत्यंत साध्या पद्धतीने काढण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष रवी किरवे यांनी सांगितले.

गणेशोत्सव2019 : पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेल्या गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम ट्रस्टच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे या वर्षी अमृतमहोत्सवी वर्ष आहे. मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते. महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाची विसर्जन मिरवणूक अत्यंत साध्या पद्धतीने काढण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष रवी किरवे यांनी सांगितले.

गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम ट्रस्टमध्ये १९४४ मध्ये वस्ताद भागुजीबुवा नागरे, परशुराम भोर, अण्णा नायर, शंकरराव रेळेकर आदी मंडळींनी गणेशाची स्थापना केली. मंडळाने १९६४ साली दशभुजा मूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजतागायत दशभुजा मूर्तीच मंडळाकडे आहे. मंडळामध्ये सर्वधर्मीय गणेशभक्त काम करत आहेत. आणीबाणीच्या काळात इमाम खान मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर पुढील अनेक वर्षे त्यांनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या या सेवेची विविध माध्यमांकडून दखल घेण्यात आली होती. मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. तसेच नुकत्याच कोल्हापूर-सांगली येथे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना मंडळाकडून मदत करण्यात आली, असे मंडळाचे अध्यक्ष रवी किरवे यांनी सांगितले. मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ५० फुटी तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Festival Dashbhuja Murti