गणेशोत्सव2019 : गणरायाच्या उत्सवाला उधाण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

या मंडळांपुढे गर्दी...

  • श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
  • हुतात्मा बाबू गेनू 
  • निंबाळकर तालीम 
  • राजाराम मंडळ 
  • हत्ती गणपती

पुणे - विघ्नहर्त्या गणरायाचे देखावे पाहण्यासाठी रविवारी दुपारपासून पुण्यनगरीतील रस्त्यारस्त्यांवर भाविक मोठ्या संख्येने आले. ‘मोरया... मोरया...’च्या जयघोषामुळे वातावरण गणेशमय झाले. संध्याकाळी पावसाने उघडीप दिली. हवेत मंद गारवा होता. अशा प्रसन्न वातावरणात लक्ष-लक्ष दिव्यांच्या लखलखाटात पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाला उधाण आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. परंतु, त्याचा परिणाम गणेशभक्‍तांवर झाला नाही. रात्री उशिरापर्यंत भाविक देखावे पाहण्यात गुंग होते. 

गौरी आणि घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. त्यानंतर रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी संध्याकाळी पुणेकर घराबाहेर पडले. दुपारनंतर पेठांमध्ये गर्दी वाढू लागली.

गणेशोत्सवाला सुरवात झाल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस संध्याकाळी पाऊस हजेरी लावत होता. त्यामुळे पुणेकर देखावे पाहण्यासाठी बाहेर पडू शकत नव्हते. रविवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. पण, दुपारनंतर विश्रांती घेतली. त्यामुळे शहर आणि परिसरातून नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात आले. 

शहरातील मध्यवर्ती भागात धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर देखावे साकारले आहेत. काही मंडळांनी सजीव देखाव्यांवर भर दिला आहे. भव्य देखाव्यांची परंपरा असलेल्या मंडळांपुढे भक्तांची गर्दी उत्तरोत्तर वाढत होती. मंडळांनी हे देखावे पाहण्यासाठी चोख व्यवस्था केली होती. भाविकांचा उत्साह बघून मंडळांचे कार्यकर्ते येणाऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते. जिवंत देखावेही थांबून पाहणाऱ्यांची संख्या मोठी होती. देखावा झाल्यानंतर देशप्रेमाचे संदेश घेऊन हे भक्त पुढच्या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी मार्गस्थ होत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Decoration Mob