गणेशोत्सव2019 : ढोल-ताशांचाही आवाज "डीजे'इतकाच !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यमेळाने पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मुख्य मिरवणूक मार्गावर जवळपास "डीजे'इतकीच ध्वनिप्रदूषणाची पातळी गाठली आहे, असे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) गुरुवारी नोंदविले. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी निश्‍चित कमी झाली आहे, असेही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या विसर्जन मार्गावरील ध्वनिप्रदूषणाच्या अभ्यासात नमूद केले आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी यंदा कमी
पुणे - ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यमेळाने पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मुख्य मिरवणूक मार्गावर जवळपास "डीजे'इतकीच ध्वनिप्रदूषणाची पातळी गाठली आहे, असे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) गुरुवारी नोंदविले. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी निश्‍चित कमी झाली आहे, असेही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या विसर्जन मार्गावरील ध्वनिप्रदूषणाच्या अभ्यासात नमूद केले आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांमध्ये चोवीस तास ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची निरीक्षणे नोंदविण्यात आली, त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. स्थलकालपरत्वे आणि शास्त्रीय पद्धतीने याची मोजणी केली. मिरवणुकीमध्ये चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे ही निरीक्षणे नोंदविली असल्याची माहिती, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पर्यावरण संशोधन केंद्राचे डॉ. महेश शिंदीकर यांनी दिली.

पारंपरिक वाद्यांमुळे आवाज हा "डीजे'इतकाच असल्याचे निरीक्षण नोंदले आहे. पण, "डीजे'मुळे होणारा थरार आणि नेहमी जाणवणारी धडधड लक्ष्मी रस्त्यावर काहीशी कमी जाणवली. मात्र, विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग वगळता शहरातील इतर मार्गांवर आणि उपनगरांमध्ये पारंपरिक वाद्य, तसेच "डीजे'देखील मुक्तपणे वापरण्यात आले. त्यामुळे आता लक्ष्मी रस्त्यावर आलेली शिस्त आणि संयोजन इतर ठिकाणीही प्रभावीपणे अमलात येण्याची गरजही त्यांनी या अभ्यासात नमूद केली आहे. नागेश पवार, सतीश सुखबोटलावार, शुभम अलटे, निशिकांत कंधारे, सुमीत शिंदे, ओंकार कामाजी, रुद्रेश हेगू, मंगेश भास्कर, भाग्येश सांखला, दिनेश गट्टूवार, गजानन बुचलवार, शुभम केवटे, प्रतीक दातीर, तुकाराम बिरादार, प्रकाश नागे, सुधीर तेलंगे, आशू राजपूर, प्रीतम बोडखे आणि बालाजी नावंदे हे विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झाले होते.

लक्ष्मी रस्त्यावर "आवाज' कमी
लक्ष्मी रस्त्यावर गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरील चोवीस तासांमधील सरासरी ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये नव्वदीच्या घरातून खाली येऊन सरासरी आवाजाची पातळी 86.2 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाली. तसेच, वेगवेगळ्या चौकांतील नोंदीतही हे ध्वनीचे प्रमाण घसरल्याचे आढळले.

किमान 58.6, तर कमाल 110.8 डेसिबल
लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौकात दुपारी चारच्या सुमारास सर्वाधिक म्हणजे 110.8 डेसिबल आवाजाची नोंद झाली, तर खंडूजी बाबा चौकात सर्वांत कमी म्हणजे 58.6 डेसिबल नोंद झाली.

अशा घेतल्या नोंदी
विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा, दुपारी चार, रात्री आठ, मध्यरात्री बारा, पहाटे चार आणि सकाळी आठ या वेळात दहा वेगवेगळ्या चौकांमध्ये आवाजाची पातळी मोजण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Dhol Tasha Sound Pollution DJ