गणेशोत्सव2019 : गणेशभक्तांची रात्री उशिरापर्यंत मांदियाळी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

गणरायाची प्रतिष्ठापना होऊन चार दिवस झाले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध आरास साकारण्यात आल्या आहेत; परंतु दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळी भाविक आरास पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे.

गणेशोत्सव2019 : जळगाव - गणरायाची प्रतिष्ठापना होऊन चार दिवस झाले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध आरास साकारण्यात आल्या आहेत; परंतु दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळी भाविक आरास पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे.

शहरात गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिक स्थळांची प्रतिकृती, सजीव आरास यांसह समाजप्रबोधन करणारे देखावे साकारण्यात आले आहेत. देखावे साकारण्याचे कामदेखील पूर्ण झाले आहे; परंतु देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत नसल्याने गणेश मंडळांमध्ये सायंकाळी तुरळक गर्दी बघावयास मिळत आहे. दिवसभरातील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी नागरिक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघत आहेत. गणेश मंडळांतर्फे रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी खुले असून, रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे.

जनजागृतीपर देखाव्यांवर भर
शहरातील अनेक मंडळांनी यंदा सामाजिक विषयांवर देखावे साकारले आहेत. त्यामध्ये पर्यावरण रक्षण, कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त भागातील चित्र आणि मदतीसाठी सरसावलेले नागरिक यांसह इतर अनेक जनजागृतीपर देखावे आहेत. त्याचबरोबर सीमेवरील जवान आणि त्यांचे जनजीवन, चालू घडामोडींवर आधारित देखाव्यांवरही अनेक मंडळांनी भर दिल्याचे दिसून येत आहे; तर सजीव देखाव्यांमधून लक्ष वेधण्याचा प्रयत्नदेखील काही मंडळांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Festival Celebration Ganpati Decoration