गणेशोत्सव2019 : सोनपावलांनी महालक्ष्मीचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

गौरीसाठी तयार मांडे, पुरणपोळ्या
गुरुवारी (ता. ५) गौराईंचे आगमन झाले. शुक्रवारी (ता. ६) गौरी पूजनाची प्रथा. या माहेरवाशीणीला गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यासाठी तयार पुरणाचे पदार्थ व इतर गोड पदार्थांच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू होती. गौरीपूजनाच्या दिवशी नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी व गौरीच्या दर्शनासाठी बोलविले जाते. यावेळी आलेल्या गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. बाजारात मांडे व पुरणाची पोळी घेण्यासाठी महिलांचा कल होता. बाजारात ६० रुपयांना एक पुरणाचा मांडा व पुरणपोळी २० रुपयांना मिळत होती. गणेशोत्सवापासूनच पुरणाचा मांडा घेण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढली आहे. गौरीपूजनासाठी मांडा लागतोच. त्यामुळे अनेकांनी काही दिवसांपूर्वीपासून ऑर्डर दिल्या होत्या, असे विक्रेत्या अर्चना देवरे यांनी सांगितले.

गणेशोत्सव2019 : इगतपुरी - गणपती बाप्पापाठोपाठ गौरीचेही गुरुवारी (ता. ५) घरोघरी आगमन झाले. आजपासून तीन दिवस त्यांचा मुक्कम राहणार आहे. शुक्रवारी महापूजा करून मिष्टान्न भोजनाचा नैवैद्य दाखविला जाणार आहे. गौराईंच्या आगमनाने महिलांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. 

नैवेद्यासाठी लागणारे केळीचे पान ते विविध फुलांचे हार, दागिने, वस्त्रमाळ, फराळाचे साहित्य, वाणाचे सामान यांसह विविध प्रकारच्या खरेदीसाठी गुरुवारी बाजारात महिलांची गर्दी झाली होती. आज गौराईंच्या आवाहनानंतर भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला. दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, सोळा भाज्यांचा साग्रसंगीत नैवेद्य दाखवून हा उत्सव साजरा होणार आहे.   यासाठी सर्वत्र खिरापत, दूध, पेढे यांचा नैवेद्य दाखवला गेला. शुक्रवारी सकाळी-सायंकाळी पुरणाचा नैवेद्य दाखविला जाईल. गौराईंच्या निमित्ताने हार, सुपारी, हारांची जोडी, पाच फळांसह अन्य फळांची खरेदी झाली. नव्याने आलेले दागिने आणि मुकुट, हार, विड्यांची पाने, वस्त्रमाळा, ओटीचे साहित्य यांची खरेदी करण्यात आली. सध्या बाजारात मुखवट्यांचे विविध प्रकार दाखल झाले असून, गौराईंच्या मुखवट्यांमध्येही शाडू, पितळी, कापड, फायबर असे बरेच प्रकार आहेत. काहीं जणांकडे केवळ मुखवट्यांची, तर काही पूर्ण उभ्या गौरी बसवतात. गणेशोत्सवातील तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन केले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Gauri Ganpati Mahalaxmi