गणेशोत्सव2019 : दोनशे गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

कासवीत ३१ वर्षांची परंपरा
आरमोरी तालुक्‍यापासून ७ किमी अंतरावर गाढवी नदीच्या तीरावर वसलेल्या कासवी गावामध्ये गेल्या ३१ वर्षांपासून श्रीबाल गणेश बहुउद्देशीय मंडळाने ‘एक गाव,एक गणपती’ परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी या मंडळाच्या गणपतीने ३१ वर्षे पूर्ण केली आहेत. यावर्षी मंडळातर्फे गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. जनजागृतीपर कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, दैनंदिन पूजापाठ, महिला व बालकांकरिता विशेष कार्यक्रम आदी मंडळातर्फे राबविण्यात येत असतात. गणेशोत्सवादरम्यान गावात कुठल्याही स्वरूपाचे भांडण, तंटे अथवा तक्रारी केल्या जात नाही. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाकरिता श्रीबाल गणेश बहुउद्देशीय मंडळाचे सर्व पदाधिकारी व गावकरी सहकार्य करीत आहेत.

गणेशोत्सव2019 : गडचिरोली - सर्व विघ्नांचे हरण करणारा विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन झाले असून जिल्ह्यात दोनशे गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना साकार होत आहे. याशिवाय जिल्ह्यात ४५० सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेश विराजमान होत आहेत. जवळपास २ हजार ६०० घरांमध्येही गणराया मुक्‍कामाला आले आहेत.

एकाच गावात अनेक मंडळांचे वेगवेगळे गणपती बसत असल्याने प्रत्येक मंडळाचा वेगळा खर्च होतो. शिवाय गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप व ऐक्‍याचा उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविली जात आहे. ही संकल्पना अनेक गावांमध्ये स्वीकारली जात असून या संकल्पनेचा वापर करणाऱ्या गावांची संख्या निरंतर वाढत आहे. पोलिस विभाग या कार्यात पुढाकार घेते. 

पोलिस विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद  देत यंदा २०० गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल असला; तरी येथे विविध जाती, धर्मांच्या सणासोबतच गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील पोलिस दल नक्षल घटनांबद्दल नेहमी सतर्क असते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होण्याच्या घटना सहसा घडत नाहीत.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या ९ उपविभागांपैकी गडचिरोली  आणि कुरखेडा उपविभागात सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन झाल्या आहेत. याशिवाय अहेरी, सिरोंचा, धानोरा, एटापल्ली, भामरागड आणि जिमलगट्टा उपविभागातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यंदा ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचा अंगीकार करणाऱ्या  दोनशे गावांमध्ये प्रत्येक गावात एकच सार्वजनिक गणपती राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Festival Celebration 200 Village