गणेशोत्सव2019 : कोथरूडमधील करिश्‍मा सोसायटीत पंढरीचा राणा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

सोसायटीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता पानसरे म्हणाल्या, ‘‘यंदा पंढरपूर व विठुमाउलीच्या भेटीला निघालेली वारी हा विषय आम्ही घेतला. आमच्या सोसायटीतील लहान मुले व तरुणांना वारीचे वेगळेपण कळावे, हा यामागचा उद्देश होता.

गणेशोत्सव2019 : पुणे - कोथरूडमधील करिश्‍मा हाउसिंग सोसायटीतील यंदाच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू होता पंढरीचा राणा. विठुरायाच्या नामाचा गजर करत येथे दिंडीही काढण्यात आली.

सोसायटीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता पानसरे म्हणाल्या, ‘‘यंदा पंढरपूर व विठुमाउलीच्या भेटीला निघालेली वारी हा विषय आम्ही घेतला. आमच्या सोसायटीतील लहान मुले व तरुणांना वारीचे वेगळेपण कळावे, हा यामागचा उद्देश होता. वारकऱ्यांच्या मनातली आध्यात्मिक ओढ, मोह ओलांडत स्वीकारलेले पायी चालण्याचे कष्ट, मात्र ते जाणवू नयेत अशी सामूहिक वाटचालीची किमया नव्या पिढीला कळावी म्हणून काही वारकऱ्यांना येथे बोलावण्यात आले.’’

‘ज्ञानोबामाऊली, तुकाराम’ असा गजर करीत त्यांनी दिंडीचा अनुभव दिला. सोसायटीच्या भव्य आवारात दीड तास चाललेल्या या दिंडीत भाविकांनी फुगडी व रिंगणाचेही प्रात्यक्षिक केले. डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन निघालेल्या भगिनी, टाळ-मृदंगांचा सुरेल नाद, पालखीतील माउलींच्या पादुका अशा रीतीने निघालेली प्रतिदिंडी पंढरपुरातील विठोबाच्या देवळाच्या रूपात सजवण्यात आलेल्या गजाननाच्या मूर्तीपाशी पोचली. 

याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे यांनी संतांनी सांगितलेला हरिनामाचा महिमा व जीवनाबद्दलचे तत्त्वज्ञान थोडक्‍यात सांगितले. रणजित व अभिजित मोरे यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे विलोभनीय रूप करिश्‍मा सोसायटीत बघायला मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Kothrud Karishma Society