गणपतीबाप्पांच्या पाठोपाठ महालक्ष्मींचे घरोघरी आगमन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

गणपतीबाप्पांच्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. पाच) अनुराधा नक्षत्रावर घराघरांत वाजत-गाजत जल्लोषात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आगमन झाले. 

औरंगाबाद - गणपतीबाप्पांच्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. पाच) अनुराधा नक्षत्रावर घराघरांत वाजत-गाजत जल्लोषात ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे आगमन झाले. 

गणेशस्थापनेनंतर घरोघरी महालक्ष्मींचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन होते. संध्याकाळी बैठकीच्या खोलीत ज्येष्ठा व कनिष्ठा विराजमान होतात. यावेळी घरोघरी आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. ‘लक्षुम्या’ येणार म्हणून सकाळपासूनच सुना-सासवांची लगबग सुरू होती. आठ दिवसांपासून घरात स्वच्छता आणि खरेदीत गृहिणी गुंतल्या होत्या. तर लहानथोरांचा सजावटीचा गलका गुरुवारी सकाळपासूनच सुरू झाला. अंगणातल्या तुळशीपासून देवघरापर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांच्या पायघड्या घालून त्यावर हळदी-कुंकू वाहण्यात आले होते.

काही घरांत भांड्यांचा गजर करीत महालक्ष्मीचे आवाहन करण्यात आले, तर काही घरांत आपल्या लाडक्‍या लेकींच्या, ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींच्या भेटीनंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करून साखर वाटण्यात आली. आरतीनंतर कढी-खिचडीचा बेत झाला. माहेरवाशीण असलेल्या गौराईच्या आगमनानंतर घराघरांत नवचैतन्य निर्माण झाले होते.

आगमनानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींना आणि त्यांच्या पिलांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो. १६ प्रकारच्या ऋतुकालोद्‌भव भाज्या बनवल्या जातात. त्यात मेथी, पडवळ, भेंडी, वांगी, घोसाळे, दोडके आदी भाज्यांचा समावेश असतो. या दिवशी प्रत्येक घरातील प्रथेनुसार एक, दोन, पाच, अकरा सुवासिनींना जेवण दिले जाते. पूजेतील केवड्याचा घरभर दरवळ उठतो. शनिवारी (ता. सात) हळदी-कुंकू करून त्यांची पाठवणी केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Ganpati in Aurangabad