esakal | त्रेचाळीस वर्षांची परंपरा असलेले सम्राट गणेश मंडळ
sakal

बोलून बातमी शोधा

Smrat Ganesh Mandal Osmanabad

उस्मानाबाद शहरातील सावरकर चौकातील सम्राट गणेश मंडळाने परराज्यातही आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणले आहे. १५ वर्षांपासून दरवर्षी प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या मंडळाला सहभागी होण्याचा मान मिळत आहे.

त्रेचाळीस वर्षांची परंपरा असलेले सम्राट गणेश मंडळ

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : शहरातील सावरकर चौकातील सम्राट गणेश मंडळाने परराज्यातही आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणले आहे. १५ वर्षांपासून दरवर्षी प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या मंडळाला सहभागी होण्याचा मान मिळत आहे. शहरातील एक प्रमुख गणपती असून मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सम्राट गणेश मंडळाचा इतिहास सुमारे ४३ वर्षांपूर्वीचा आहे. १९७७ मध्ये मंडळाची स्थापना झाली होती.

 वाचा : निजामकालीन मानाची परंपरा यंदा खंडीत, बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा

सध्या मंडळाची धुरा नगरसेवक बाळासाहेब काकडे यांच्या खांद्यावर असून ते मार्गदर्शक म्हणून काम करतात. मंडळाने स्वतःच्या खर्चाने २००२ मध्ये गणरायाचे मंदिर उभारले आहे. दररोज भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. गणेश चतुर्थीला येथे भाविक मोठी गर्दी करतात. गणरायाच्या मूर्तीला सोन्याचे चांदीचे दागिने असून दात मात्र सोन्याचे आहेत. दरवर्षी मंडळातील नवनवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाते.

सामाजिक उपक्रम
गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शहरातील सावरकर चौकात मंडळाने प्रथम वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली होती. शिवाय चौकात मंडळाने स्वखर्चाने कारंजे उभारले आहे. त्यामुळे परिसराला एक वेगळीच झळाळी मिळाली आहे.

अनोखे झांज पथक
दरवर्षी तिरुपती मंदिराच्या वतीने ब्रह्मोत्सव भरविला जातो. नवरात्राच्या काळात असलेल्या या महोत्सवात विविध राज्यातील कलाकृतीचे दर्शन घडविले जाते. सम्राट गणेश मंडळाचे ६० जणांचे झांज पथक या महोत्सवात सहभागी होते. पथकाकडून येथील कलेचा अविष्कार मंदिराच्या त्या महोत्सवात सादर केला जातो. गेल्या १५ वर्षांपासून मंडळाला याचा मान मिळत आहे. एका वेळी बद्रिनाथ येथेही झांज पथकाची कला सादर करण्यात आली होती. परराज्यातही मराठी कलेचा अविष्कार दाखविण्यात पथकाला यश आले आहे.

संपादन : गणेश पिटेकर

loading image