गणेशोत्सव2019 : गणरायाला भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मुसळधार पाऊस झोडपत असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मुंबई - मुसळधार पाऊस झोडपत असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.  

चौपाट्या आणि विसर्जन स्थळांवर शनिवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेशमूर्तींची आणि गौरींची विधिवत पूजाअर्चा, विसर्जनाला सुरुवात केली.  जुहू, गिरगाव, दादर, माहीम चौपाटी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव आदी ठिकाणी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. पालिकेने विसर्जनस्थळी जय्यत तयारी केली होती. वैद्यकीय पथक, घनकचरा विभागाचे सफाई कर्मचारी, निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी डम्पर, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, विसर्जनासाठी तराफे आदी सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईतील समुद्र, तलाव, खाडी आणि कृत्रिम तलावांत घरगुती ५,५४० आणि सार्वजनिक ३२ गणेशमूर्ती तसेच ९३६ गौरी अशा एकूण ६,५०८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात केवळ कृत्रिम तलावांत सार्वजनिक पाच आणि घरगुती ९५२ गणेशमूर्ती व १५२ गौरी अशा एकूण १,१०९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Ganpati Visarjan in Mumbai