गणेशोत्सव2019 : पुण्यात जिवंत देखावे आणताहेत जान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

 पारंपरिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच यंदा सजीव देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. देखाव्यातून कोणी पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिले आहे, तर कोणी मोबाईल गेममुळे मुलांच्या मनावर होणारे दुष्परिणाम दाखविले आहेत.

पुणे -  पारंपरिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच यंदा सजीव देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. देखाव्यातून कोणी पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिले आहे, तर कोणी मोबाईल गेममुळे मुलांच्या मनावर होणारे दुष्परिणाम दाखविले आहेत. पोलिसांच्या तणावयुक्त आयुष्यावर प्रकाश टाकतानाच, काही मंडळांनी मोबाईलमुळे वाढणारा विसंवादही आपल्या सजीव देखाव्यातून मांडला आहे. या देखाव्यांकडे भाविकांची पावले वळत आहेत.

पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देश-परदेशांतील भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. भाविकांचे मनोरंजन करतानाच बहुतांश मंडळे आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनावर भर देतात. यंदा सजीव देखाव्यांवर मंडळांनी भर दिल्याचे चित्र आहे. पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस दलाच्या तणावयुक्त आयुष्यावर नाना पेठेतील हिंद माता तरुण मंडळाने ‘सद्‍रक्षणायक खलनिग्रहणाय’ या सजीव देखाव्याद्वारे प्रकाश टाकला आहे. सेवा मित्र मंडळाने बदलत्या काळामध्ये कुटुंबामधील संवाद हरपत चालल्याचे वास्तव ‘कमी होत चाललाय संवाद’ या देखाव्यातून मांडला आहे. जय जवान मित्र मंडळाने मोबाईल गेमच्या आहारी गेलेली लहान मुले, तरुणांच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘मोबाईल गेम एक घातक व्यसन’ हा देखावा सादर केला आहे. सोमवार पेठ गोसावीपुरा गणेशोत्सव मंडळाने ‘खेकडा पार्टी’ या देखाव्यातून पाणीबचतीचा संदेश दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kasba peth Ganesh Decoraition