गणेशोत्सव2019 : गणेशभक्‍तांनी पेठा गजबजल्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आणि गणेशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली.

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आणि गणेशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली. ‘वीकेण्ड’ असल्याने शनिवारी (ता.७) मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर सर्वत्र गणेशभक्‍तच दिसत होते. तरुणांसह कुटुंबेही गणेशाच्या दर्शनासाठी आल्याने सायंकाळनंतर गर्दीत वाढ झाली.

शहरातील गणेश मंडळांनी उभारलेले पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी केली होती. त्यात मानाचे गणपती आणि महत्त्वाचे गणपती शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यामुळे उपनगर आणि शहराच्या दुसऱ्या भागातून दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने आले होते. पेठांतील मंडळांच्या देखाव्याला नागरिकांची पसंती मिळत आहे. सुटीचा दिवस असल्याने तरुण-तरुणींबरोबर कुटुंबासह लोक गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडले होते. मंडळांची आकर्षक विद्युत रोषणाई आणि देखावे सर्वांचेच लक्ष वेधत होते. 

कसबा पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ या भागात नागरिकांची सर्वाधिक गर्दी होती. शहरातील आणि शिक्षणासाठी शहरात आलेले विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. गर्दीतदेखील तरुणांना बाप्पाबरोबर ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याऱ्या पोलिसांबरोबर पोलिस मित्रही मोठ्या संख्येने रस्त्यावर होते. दरम्यान, दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. मात्र, त्याचा गणेशभक्तांवर परिणाम झाला नाही.

वाहतूक कोंडीही 
गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. यासह अन्य काही रस्तेही बंद केले होते. त्यामुळे मध्यवर्ती भागातील काही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली  होती; तर काही रस्त्यावर चालकांना नागरिकांच्या गर्दीतून रस्ता काढत जावे लागत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Ganesh bhakat