केंद्र मूर्तिकलेचे अन्‌ रोजगाराचेही

महेंद्र दुसार
Thursday, 5 September 2019

गणेशमूर्ती तयार करण्याची अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पेण गावाने मूर्तिकला क्षेत्रात आपले नाव सातासमुद्रापार पोचविले आहे. एक गणेशमूर्ती तयार करताना अनेक कलाकारांचे हात एकत्र येत असतात. या हातांचा गुणाकार करून कलावंतांची ही कला व्यवसायाभिमुख होत असतानाच ती संस्कृती म्हणूनही टिकवण्याची गरज आहे.

महाराष्ट्र माझा : कोकण 
गणेशमूर्ती तयार करण्याची अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पेण गावाने मूर्तिकला क्षेत्रात आपले नाव सातासमुद्रापार पोचविले आहे. एक गणेशमूर्ती तयार करताना अनेक कलाकारांचे हात एकत्र येत असतात. या हातांचा गुणाकार करून कलावंतांची ही कला व्यवसायाभिमुख होत असतानाच ती संस्कृती म्हणूनही टिकवण्याची गरज आहे.

गणेशमूर्तींसाठी देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार ओळख असणारे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही या गावातील हजारो गणेशमूर्ती असंख्य ठिकाणी विराजमान झाल्या आहेत. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या गावाने मूर्तिकला क्षेत्रात आपले नाव सातासमुद्रापार पोचविले आहे. या मूर्तिकामात आता केवळ कलाभक्तीच राहिलेली नाही, तर ते रोजगाराचे माध्यम आणि व्यवसाय झाला आहे.

पेण परिसरात मूर्तिकला विकसित होण्याची अनेक कारणे आहेत. मूर्ती कारखान्यांसाठी मुबलक जागा, कारागिरांची मुबलकता, त्यांना द्यावी लागणारी कमीत कमी मजुरी, यामुळे पेण आणि परिसरात गणेशमूर्तींचे कारखाने दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुंबईमधील सार्वजनिक गणेश मंडळांसह गावोगावी येथून मूर्ती जातात. एवढ्यासाठीच हे मूर्तिकलेचे गाव प्रसिद्ध नसून, जगातील मूर्तिकलाप्रेमींनाही या गावाने प्रेमात पाडले आहे. या गावाची ख्याती सर्वदूर पोचत गेली, तसतशी येथील मूर्तींची मागणी वाढत गेली. वाढत्या मागणीनुसार या गावातला रोजगारही वाढत गेला. आता त्याच मूर्तिकलेचे कारखाने उभे राहू लागले आहेत. कमी वेळेत कौशल्य पणास लावून जास्तीत जास्त सुरेख मूर्ती साकारण्यासाठी साचे तयार होऊ लागले. त्या साच्यातील मूर्तींवर आखीवरेखीव कलाकुसर करणाऱ्या कारागिरांचे कौशल्य अद्यापही शाबूत आहे. गणेशमूर्तींच्या डोळ्यांत जिवंतपणा आणण्याचे कसब खरेतर साच्यात बसवणे अवघडच आहे.  

एक साचा बनविल्यानंतर त्यातून एकसारख्या हजारो मूर्ती बनविल्या जात असल्या तरी, त्या मूर्तीवरचे कारागिरीचे काम कलावंतांना करावेच लागते. त्यात जुन्या पिढीतील जाणकार तर आहेतच; पण तरुण कलाकारही ही कलाकुसर अवगत करत आहेत. मात्र, मूर्ती साकारण्याची कला, मातीला आकार देण्याचे काम खूप कमी प्रमाणात होत आहे. पेण तालुक्‍यातील हमरापूर, जिते, रावे, अंतोरा परिसरात रस्त्यांच्या बाजूला एकसारख्या हजारो मूर्ती गणेशोत्सव जवळ येताच दिसू लागतात. पूर्वी गणेशमूर्तीच्या निर्मितीस्थळांना ‘गणेशमूर्ती कार्यशाळा’ म्हणत असत, आता या स्थळांचे कारखाने झाले आहेत, याची खंत येथील गणेशमूर्ती कारागिरांनाही वाटते. 

मार्गदर्शनासाठी परदेशातून निमंत्रण

येथील मूर्तिकार मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांना युरोपातील संग्रहालयातर्फे कार्यशाळेत मार्गदर्शन करण्याकरिता गेली अनेक वर्षे निमंत्रित केले जाते. त्यानिमित्ताने पेणची गणेशविद्या परदेशात पोचविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. युरोपातील अनेक शहरांत नामवंत संग्रहालये आहेत. अशा संग्रहालयांतर्फे युरोप व्यतिरिक्त इतरत्र कला आणि संस्कृतीची ओळख तेथील नागरिकांना करून देण्याचे कार्य सुरू असते. त्यात आशिया खंडातील एक स्वतंत्र दालन आहे. त्याचा एक भाग म्हणून तेथे गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. स्वित्झर्लंडमधील संग्रहालयात श्रीकांत देवधर हे मूर्तिकलेचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी काही वर्षापूर्वी गेले होते. देवधर यांनी मातीच्या गणेशमूर्ती तयार करून दाखविल्या आणि मूर्तींची कलाकुसर, दागिने व मूर्ती रंगविण्याचे प्रशिक्षण त्यांनी तेथील मुलांना दिले. अशा काही संग्रहालयांतर्फे पाच दिवसांचा गणेशोत्सवही साजरा करण्यात येतो. 

कलेची संस्कृती टिकावी
परदेशातील अनेक कलाकारांना ही गणेशमूर्ती साकारण्याची कला अवगत करावीशी वाटते. त्यासाठी ते मूर्तिकलेचा अभ्यास करण्यासाठी पेणमध्ये येत असतात. पेण परिसरात काही जुने मूर्तिकार अद्यापही मातीतून मूर्ती तयार साकारतात. मात्र, या कलेला कारखानदारीचे स्वरूप येत असल्याने हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचा की गणेशमूर्ती तयार करण्याची संस्कृती टिकवायची, अशा द्विधा मन:स्थितीत आजची पिढी सापडली आहे. डोळ्यांची आखणी, रंगकाम, साचे करणारे अशी वेगवेगळी कामे वेगवेगळे कारागीर करीत असतात. एक मूर्ती करण्यासाठी अनेकांचे हात लागत असतात. या हातांचा गुणाकार करून कलावंतांची ही कला व्यवसायाभिमुख होत असतानाच ती संस्कृती म्हणूनही टिकवण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan sculpture and employment center