अबब! हिंगोलीत लाखो मोदकांचा मोदकोत्सव!! (व्हिडिओ)

मंगेश शेवाळकर
Thursday, 12 September 2019

मोदक तयार करत असताना काही भाविक तेथे आले होते. त्यांनी हा मोदक प्रसाद म्हणून घेतला. यावेळी भाविकांनी नवस बोलून पुढे वर्षभर या मोदकाची पूजा केली. त्यानंतर मिस्कीन यांनी दरवर्षी मोदकांची संख्या वाढवली. त्यानुसार मोदक घेऊन नवस बोलणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत गेली.

हिंगोली : तुमच्या-आमच्याकडे गणपतीत किती मोदक बनविले जात असतील? फार तर पाच-पन्नास किंवा मंडळे प्रसादाचे शेकडो मोदक प्रसाद म्हणून वाटत असतील. पण हिंगोलीत दरवर्षी अनंत चतुर्दशीला तब्बल लाखो मोदक प्रसाद म्हणून वाटले जातात. यंदा चक्क पावणेतीन लाखांहून अधिक मोदक प्रसाद म्हणून वाटले जात आहेत. तेवढ्याच भाविकांनी आज हिंगोलीत या मोदकोत्सवासाठी हजेरी लावली आहे.

याबाबतची माहिती अशी, हिंगोली शहरातील गड्डेपीर गल्ली भागामध्ये रमाकांत मिस्कीन यांनी एक घर खरेदी केले होते. घराची साफसफाई करत असताना त्यांना गणेशोत्सवाच्या दरम्यान एक गणेश मूर्ती सापडली. मिस्किन यांनी गणेश मूर्तीची स्थापना विघ्नहर्ता चिंतामणी गणपती या नावाने केली. त्यानंतर १९९२ मध्ये त्यांनी या गणेशाला गणेशोत्सवाच्या काळामध्ये १०८ मोदकांचा नैवेद्य दाखवला.

मोदक तयार करत असताना काही भाविक तेथे आले होते. त्यांनी हा मोदक प्रसाद म्हणून घेतला. यावेळी भाविकांनी नवस बोलून पुढे वर्षभर या मोदकाची पूजा केली. त्यानंतर मिस्कीन यांनी दरवर्षी मोदकांची संख्या वाढवली. त्यानुसार मोदक घेऊन नवस बोलणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत गेली.

आज मिस्कीन यांनी २ लाख ७७ हजार मोदकांचे वाटप सुरू केली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. या भाविकांना मिस्कीन यांच्यावतीने नवसाचा मोदक दिला जातो.

मागील २८ वर्षांपासून सुरू असलेली मोदक उत्सवाची परंपरा कायम आहे. नवसाचा मोदक घेतलेल्या भाविकांचा नवस पूर्ण झाल्यानंतर भाविकांकडून १००८ मोदक अर्पण केले जातात. मात्र यापैकी एकच मोदक गणपतीजवळ ठेवून उर्वरित मोदक प्रसाद म्हणून भाविकाकडे परत दिला जातो. तर, नवसाचा मोदक नवस पूर्ण झाल्यानंतर वाहत्या पाण्यात विसर्जित केला जातो.

आज सकाळपासूनच हिंगोली शहरामध्ये महाराष्ट्रासह राज्याबाहेरील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नवसाचा मोदक घेण्यासाठी सुमारे अडीच लाखांपेक्षा अधिक भाविक हिंगोली शहरात दाखल झाले आहेत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी रमाकांत मिस्कीन गणपती संस्थानचे पदाधिकारी दिलीप बांगर यांच्यासह स्वयंसेवकांनी कामाचे नियोजन केले आहे. त्यासाठी पोलीस दलाचीही मदत घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील दानशूर व्यक्तींकडून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या चहा पाण्यासोबतच भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

यामध्ये लोकप्रतिनिधीदेखील भाविकांच्या सेवेत तत्पर राहतात. आज हिंगोली शहरांमध्ये ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम सुरू आहेत. मागील काही वर्षात भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता यावर्षी अनंत चतुर्दशीनंतर पुढील चार दिवसापर्यंत नवसाचा मोदक दिला जाणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modak Festival in Hingoli Lakhs of Modak