कुंकू-हळदीने रंगवलेल्या मूर्तींना मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

कुंकू, हळद, गुलाल व मुलतानी मातीने रंगवलेल्या गणपतीच्या मूर्तींना नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

नवी मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्यात आली. त्यामुळे नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करण्यास नागरिक पुढाकार घेत आहेत. त्यातच आता कुंकू, हळद, गुलाल व मुलतानी मातीने रंगवलेल्या गणपतीच्या मूर्तींना नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.
 
शाडूच्या मातीच्या मूर्तींवरील रंग हे काही प्रमाणात पर्यावरणाला हानिकारक असल्याने सध्या कुंकू, हळद, गुलाल व मुलतानी मातीने रंगवलेल्या गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणप्रेमी नागरिक प्राधान्य देत असताना दिसत आहेत. ६ इंच ते २४ इंचापर्यंत असणाऱ्या या मूर्तींची किंमत ३०० ते सहा हजार रुपयांपर्यंत आहे. दगडूशेठ, लालबागचा राजा, टिटवाळ्याचा गणपती, उंदीर किंवा सोफ्यावर बसलेला गणपती या प्रकारातील गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. २४ इंचांपर्यंतच्या या मूर्ती पाण्यात विरघळण्यास २४ तास घेऊ शकतात. पूर्णपणे पाण्यात भिजल्या तरच त्या मूर्ती विरघळू शकतात, अन्यथा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसारखीच या मूर्तीही मजबूत असतात, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.

कुंकू-हळदीने रंगवलेल्या या मूर्ती ३-४ तासांत घरातच बादलीतील पाण्यात विसर्जित करता येतात. याशिवाय घरी नेऊन स्वतः रंगवणे शक्‍य असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. 
- सलीता नाईक, विक्रेत्या, बेलापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for kumku-turmeric painted idols