गणेशोत्सवात नवी मुंबई महापालिकेची प्लास्टिकविरोधी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

ऐन सणासुदीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला ऊत येत असल्यामुळे गणेशोत्सव काळात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे कठोर निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी विभागप्रमुखांसहित उपायुक्तांना दिले आहेत.

नवी मुंबई : बाजारपेठा आणि सिग्नलवर सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंबर कसली आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला ऊत येत असल्यामुळे गणेशोत्सव काळात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे कठोर निर्देश मिसाळ यांनी विभागप्रमुखांसहित उपायुक्तांना दिले आहेत. तसेच प्लास्टिकचा वापर करणारे व्यावसायिक शोधत बसण्यापेक्षा एकाच बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून बाजारपेठांमधून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्याचा मनसुबा प्रशासनाने आखला आहे. 

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणात पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्लास्टिकच्या भस्मासुराचा कायमचा नायनाट करण्याचा निर्धार केला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेतर्फे मोठी पावले उचलण्यात आली आहेत. घनकचरा विभागांतर्गत असणारे स्वच्छता निरीक्षक, विभाग कार्यालयामार्फत एकेका व्यावसायिकाला केंद्रित न करता नोडनिहाय बाजारपेठा लक्ष्य करण्याचे आदेश मिसाळ यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकांआधी आलेल्या विविध सणांमुळे प्लास्टिकविरोधी कारवाई काही अंशी मंदावल्याने बाजारात वस्तू विक्री करताना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा सर्रासपणे सुरू होता. हेच सत्र गणेशोत्सव काळातही सुरू राहण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांमार्फत वर्तवली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात सध्या सजलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये ऐरोली, दिघा, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ व बेलापूर नोडमधील बाजारपेठांचा समावेश आहे. 

पुनर्वापर करण्याचे आदेश
महापालिकेच्या कारवायांमध्ये पकडल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या अथवा वस्तूंचा पुनर्वापर करण्याचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचे विचार आहेत. त्याकरिता युनिलिव्हर आणि बिस्लेरी या नामांकित कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच कोणत्या रहिवाशाकडे घरात प्लास्टिक असेल तर त्यांनी महापालिकेकडे संपर्क करावा, असे आवाहनही मिसाळ यांनी केले आहे. 

महापालिकेच्या पथकांमार्फत एक-दोन व्यावसायिकांवर कारवाई केल्याचा फारसा परिणाम प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोखण्यात झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात नोडनिहाय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation's Anti-Plastic Campaign in Ganeshotsav