नऊ दशके शाडूच्याच मातीपासून गणेशमूर्ती! 

मनोज कळमकर
Saturday, 24 August 2019

शाडूच्या मूर्ती बनविताना तासन्‌तास एका जागी बसावे लागते. त्यामुळे कारागीराची कसोटी लागते. कलेबरोबर कष्ट करण्याची तयारी असणारे या व्यवसायात टिकू शकतात. त्यामुळे शाडूच्या मूर्तींचा वारसा यापुढे टिकेल की नाही, याबाबत शंका आहे. 

मुंबई ः पर्यावरण जनजागृतीसाठी दर वर्षी मोठा गाजावाजा केला जातो; मात्र गेली नऊ दशके प्रसिद्धीपासून दूर राहून पर्यावरणाप्रती आस्था बाळगून येथील मूर्तिकार दीपक ऊर्फ बाळू मानकामे दोन पिढ्या पर्यावरणाचा वसा जपत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे कमी श्रमात पैसा जास्त मिळत असला तरी ते गेली कित्येक वर्षे शाडूच्याच मूर्ती बनवित आहेत.

सण-उत्सवाची चाहूल श्रावण महिना सुरू झाली की लागते. त्यानंतर लहानांपासून मोठ्यांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. त्यामुळे मूर्तिकारांचीही लगबग सुरू होते. गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवत सुबक मूर्ती बनविण्यात मूर्तिकार मग्न असतात. सध्या सर्वत्र इको फ्रेंडली गणेशमूर्तीसाठी पर्यावरणवादी आग्रह धरताना दिसत असले तरी शाडूच्या मूर्तीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींकडे अनेकांचा कौल दिसून येतो; परंतु गेली नऊ दशके पर्यावरणाशी नाळ जोडून केवळ शाडूच्या मूर्ती तयार करण्याला प्राधान्य देणारे खालापूरचे दीपक ऊर्फ बाळू मानकामे यांच्या दोन पिढ्या पर्यावरणाचा वसा जपत आहेत. दीपक यांचे वडील शंकर मानकामे यांनी खालापूर परिसरात गणपती कला केंद्र सुरू केले त्या वेळी धामणी व खालापूर गाव मिळून चार कला केंद्रे होती. हळूहळू ही संख्या कमी होत जाऊन केवळ शाडूच्या मूर्ती बनविणारे दीपक मानकामे यांचे पंचक्रोशीत एकमेव कला केंद्र आहे.

55 वर्षे वडिलांनी सांभाळलेला व्यवसाय दीपक यांनी 40 वर्षे अविरत सुरू ठेवला असून, मुळातच कलेची आवड असल्यामुळे नोकरीत दीपक यांचे मन रमले नाही. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दीपक यांनी प्रसंगी लाथाडल्या. शाडूच्या मूर्ती तयार करणे कठीण काम असून, दिवसात जेमतेम दोन-तीन मूर्ती घडविल्या जातात. तसेच शाडू मातीचे काम करणारे कारागीरही मुश्‍किलीने मिळत असल्याचे दीपक सांगतात. वाढती महागाई, शाडूच्या मातीचे वाढते भाव आणि कारागीर मिळालाच तर त्याला द्यावा लागणारा भरमसाठ मेहनताना यामुळे शाडूची मूर्ती बनविणे दिवसेंदिवस जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तींचे भाव प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा वाढत जातात, असे मानकामे सांगतात; परंतु आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगी व दोन मुलांचा हातभार लाभत असल्यामुळे या व्यवसायात अद्याप टिकून असल्याचे बाळू आवर्जून सांगतात. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पूर्णपणे विघटन होत असल्याने पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत होत असल्याने दीपक अशा मूर्तींचा आग्रह धरतात. 

शाडूच्या मूर्ती बनविताना तासन्‌तास एका जागी बसावे लागते. त्यामुळे कारागीराची कसोटी लागते. कलेबरोबर कष्ट करण्याची तयारी असणारे या व्यवसायात टिकू शकतात. त्यामुळे शाडूच्या मूर्तींचा वारसा यापुढे टिकेल की नाही, याबाबत शंका आहे. 
- दीपक मानकामे, मूर्तिकार, खालापूर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue eco friendly ganesh statue