कोल्हापूर : इको फ्रेंडली गणेशमूर्तीची नव्या राजवाड्यात प्रतिष्ठापना 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

कोल्हापूर - कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे आज आगमन झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून त्याची मिरवणूक काढली. नव्या राजवाड्यात मूर्तीची राजेशाही थाटात प्रतिष्ठापना झाली. 

कोल्हापूर - कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे आज आगमन झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून त्याची मिरवणूक काढली. नव्या राजवाड्यात मूर्तीची राजेशाही थाटात प्रतिष्ठापना झाली. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती घराण्याच्या इको फ्रेंडली मूर्तीची कुंभार गल्लीतून मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या अग्रभागी घोड्यावर स्वार ध्वजधारी होता, तर पालखी वाहण्याचे काम भोई बांधवांकडे होते. महापालिका, सीपीआर चौक, महावीर महाविद्यालयामार्गे न्यू पॅलेसच्या प्रवेशद्वारावर मूर्ती आल्यानंतर कसबेकर कुटुंबीयांनी मूर्तीचे स्वागत केले. त्यानंतर न्यू पॅलेसमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, याज्ञसेनी महाराणी, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजे यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर पॅलेसमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

""छत्रपती घराणे इको फ्रेंडली मूर्तीची प्रतिष्ठापना करते. गणेशोत्सव सर्वसामान्यांप्रमाणेच साजरा करते. यंदा महापुराचा तडाखा बसल्याने कोल्हापूरकरांना उत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक मंडळांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.'' 

- संभाजीराजे

श्रीमंत शाहू महाराजांनी घेतला फोटो 
मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातील कॅमेरामनने त्याचे शूटिंग केले. प्रिंट माध्यमातील छायाचित्रकारांनी छायाचित्रे टिपली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासमवेत कॅमेरामन व छायाचित्रकारांनी छायाचित्र घेतले. त्यानंतर शाहू महाराजांना मूर्तीसमवेत या सर्वांचा फोटो घेण्याचा मोह झाला. त्यांनी हातात कॅमेरा घेत मूर्तीसमवेत सर्वांचा फोटो टिपला. 

भोई बांधवांनी वाहिली पालखी 
भोई बांधव परंपरेने गणेशमूर्तीची पालखी वाहतात. त्याचा त्यांना मान दिला आहे. ते दसऱ्यापर्यंत (विजयादशमी) छत्रपती घराण्याने दिलेल्या धार्मिक विधीच्या सेवेत असतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival in New Palace Kolhapur