मुस्लिम मित्राच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

रशीद शेख यांना आम्ही गणपती बसवायला बोलवतो. त्यांनाही या गोष्टीचा आनंद वाटतो आणि आम्हालाही. १० दिवस नियमित आरतीला शेख कुटुंबीय न चुकता हजर असते.
- गणेश केंडे, करमाळा

करमाळा - येथील गणेश केंडे हे गेल्या १५ वर्षांपासून आपला जीवाभावाचा मुस्लिम मित्र रशीद शेख यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. शहरातील हे एक वेगळे उदाहरण पाहायला मिळत आहे. सलग १० दिवस शेख कुटुंब गणपतीच्या आरतीला हजर राहतात. 

रशीद शेख हे रंभापुरा भागात राहणारे गणेश केंडे यांचे शेजारी आहेत. दोघांची मैत्रीही चांगली आहे. मुस्लिम मित्र रशीद शेख यांच्या हस्ते १५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा गणपती बसवला. तेव्हापासून सलग हा उपक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे रशीद शेख यांच्यासह त्यांच्या पत्नीही या कार्यात सहभागी होतात.

त्याचप्रमाणे गणेश केंडे यांचे संपूर्ण कुटुंब रशीद शेख यांची दरवर्षी वाट पाहत असते. ज्या पद्धतीने हिंदू व्यक्ती गणपतीची स्थापना करताना रितीरिवाज पाळून स्थापना करतो अगदी त्याच प्रमाणे रशीद शेख ही स्थापना करण्यासाठी काळजी घेतात. तर, गणपतीची आरती शेख यांना तोंडपाठ असून संपूर्ण १० दिवस केंडे कुटुंबासोबत शेख कुटुंब गणपतीचे कार्यक्रम पार पाडतात. 

आपण जातिधर्माच्या पलीकडे जाऊन जीवन जगले पाहिजे. गणेश केंडे आणि आम्ही शेजारीच राहतो. लहानपणापासून मी गणपतीची आरती म्हणतो. गणेश दरवर्षी गणपती बसवायला मला बोलवतात. या गोष्टीचा आनंद वाटतो. 
- रशीद शेख, करमाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Muslim Friend Rashid Shaikh Ganesh Kende Ganpati