सांगली संस्थानच्या "श्रीं' ची प्रतिष्ठापना 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

सांगली - येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या गणपतीची राजवाडा चौकातील दरबार हॉलमध्ये आज परंपरेने प्रतिष्ठापना झाली. महापुरामुळे यंदा संस्थानचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दरबार हॉलमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई यंदा करण्यात आली नाही.

सांगली - येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या गणपतीची राजवाडा चौकातील दरबार हॉलमध्ये आज परंपरेने प्रतिष्ठापना झाली. महापुरामुळे यंदा संस्थानचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दरबार हॉलमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई यंदा करण्यात आली नाही. 

कृष्णेला आलेल्या महापुराचे पाणी यंदा संस्थानच्या गणपती मंदिरात तसेच राजवाडा चौकातील दरबार हॉलमध्ये आले होते. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातून सांगलीकर सावरत आहेत. त्यामुळे संस्थानच्यावतीने थाटात केला जाणारा गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा केला जात आहे. 

आज सकाळी गणपती मंदिरपासून पालखीतून "श्री' ची मिरवणूक निघाली. कृष्णा नदीकाठावर प्रथम मिरवणूक गेली. तेथे पूजा झाल्यानंतर पालखी राजवाडा चौकातील दरबार हॉलकडे निघाली. मानाच्या "श्री' चे मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी "मोरया' च्या गजरात स्वागत झाले. गणपती पेठ, पटेल चौक, राजवाडा चौकमार्गे "श्रीं' ची पालखी दरबार हॉलसमोर आल्यानंतर "गणपती बाप्पा मोरया' चा गजर झाला. 

सांगली संस्थानचे विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांनी "श्री' च्या पालखीचे आणि भक्तगणांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत "श्रीं' ची आरती झाली. माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे, मानसिंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेकांनी मानाच्या "श्रीं' चे दर्शन घेतले. 

दरम्यान गणेशोत्सवावर महापुराचे सावट असल्यामुळे संस्थानतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Sansthan Ganesh Pratishtapna