
घराच्या देवळीतून सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे पुढे नवजवान मित्र मंडळ ट्रस्टमध्ये रूपांतर झाले. या मंडळाचे या वर्षीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
पुणे - घराच्या देवळीतून सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे पुढे नवजवान मित्र मंडळ ट्रस्टमध्ये रूपांतर झाले. या मंडळाचे या वर्षीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गणेशोत्सवात खर्च कमी करून सामाजिक कामात, विशेषतः गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे मंडळाचे वेगळेपण आहे. या महोत्सवी वर्षात कोल्हापूर- सांगली भागातील काही पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वर्षभराचे शालेय साहित्य दिले जाणार आहे.
नवजवान मित्र मंडळाची सुरवात गणेश पेठेतील एका घरात सन १८९४ मध्ये झाली. जयंत मालेगावकर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मंडळाचा गणेशोत्सव सुरू केला, त्या वेळी लोकमान्य टिळक हे पहिल्या आरतीसाठी उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर त्याचे मंडळात रूपांतर होऊन गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. गुलाबसिंग गोंधळे यांनी १९७२ मध्ये मंडळाचे नवजवान मित्र मंडळ हे नामकरण केले, तेव्हापासून मंडळाकडून पौराणिक देखावे सादर केले जातात. गेल्या दहा वर्षांपासून मंडळाकडून वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, नेत्र तपासणी, दिवाळी फराळ वाटप, थंडीमध्ये पदपथावरील लोकांना चादर वाटप असे उपक्रम वर्षभर राबविले जातात. मंडळाने महोत्सवी वर्षानिमित्त मोठा खर्च टाळून अगदी साध्या पद्धतीने विविध फुलांची आरास साकारून त्यामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
‘‘या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम मंडळाकडून राबविले जात आहेत. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहे,’’ असे मंडळाचे अध्यक्ष नितीन शेंडगे यांनी सांगितले.