जोशी बंगल्यातील श्रीगणेश भाविकांचे आपुलकीचे स्थान

नीला शर्मा
Tuesday, 3 September 2019

प्रभात रस्त्यावरील जोशी यांच्या बंगल्यातील खासगी गणेश मंदिर हे परिसरातील रहिवाशांसाठी आपुलकीचे स्थान झाले आहे. छोटेखानी मंदिर, बाहेर विस्तीर्ण ओटा, तुळशी वृंदावन आदींमुळे घरगुतीपणाची भावना येथे जाणवते.

पुणे - प्रभात रस्त्यावरील जोशी यांच्या बंगल्यातील खासगी गणेश मंदिर हे परिसरातील रहिवाशांसाठी आपुलकीचे स्थान झाले आहे. छोटेखानी मंदिर, बाहेर विस्तीर्ण ओटा, तुळशी वृंदावन आदींमुळे घरगुतीपणाची भावना येथे जाणवते. 

या बंगल्याच्या मालकीण विनया विद्याधर जोशी म्हणाल्या, ‘माझ्या सासूबाई कमळाबाई पंढरीनाथ जोशी यांनी हे मंदिर उभारले. परिसरातील ज्येष्ठ महिला या ठिकाणी संध्याकाळी जमतात. भजन, पूजन करतात. त्यांच्यासाठी ही जागा फार आपुलकीची झाली आहे. छोटी मुले अधूनमधून पालकांबरोबर येतात. परीक्षेत उत्तीर्ण झाले की, या गणपतीसमोर पेढा ठेवायलाही येतात. कोणाच्या घरी मंगलकार्य ठरले की, ती मंडळी गणपतीला नमस्कार करायला येतात. अशा प्रकारे आमचे हे खासगी मंदिर असले तरी जवळपासच्या लोकांसाठीही हे श्रद्धास्थान आहे.’

बंगल्याच्या बाहेर फळे विकायला बसणारे गोविंद भालके म्हणाले, ‘गणेश जयंतीला येथे गणेशयाग केला जातो. दिवाळीत महिनाभर काकडआरती चालते. एकादशीला भजनाचा कार्यक्रम होतो. भक्त आपापल्या परीने प्रसाद तयार करून आणतात. शुभ्र रंगाची असल्याने ही गणेशमूर्ती पाहणाऱ्याला मोहून घेते. या परिसरातील रहिवाशांकडून माहिती मिळाल्यावर दुसऱ्या भागातले लोक आवर्जून ही सुबक, छोटी मूर्ती बघायला येतात. पाच-सहा वर्षांपूर्वी येथे गाय होती. तिला नैवेद्य खाऊ घालायला जवळपासची माणसे येत असत. तिच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.’

विशेष म्हणजे येथे महिला पुजारी देवाची पूजा-अर्चा करत आहेत. म्हटले तर खासगी; पण तरीही समाजाला सामावून घेणाऱ्या या गणेश मंदिराची अपूर्वाई खासच म्हणायला हवी. हे भक्तिस्थळ तर आहेच; पण वयोवृद्ध महिलांसाठी विरंगुळा, विसावा या स्वरूपाचा प्रसाद देणारे बाप्पाचे घर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Joshi Bunglow Bhavik Pune