गणेशोत्सव2019 : सामाजिक उपक्रमांचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

मराठा मित्र मंडळ गेल्या तीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश शेडगे यांनी दिली.

गणेशोत्सव2019 : पुणे - मराठा मित्र मंडळ गेल्या तीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश शेडगे यांनी दिली.

मंडळाची स्थापना १९७० मध्ये राजेंद्र साळुंके, गिरीश साळुंके, संतोष भांबुरे, उमेश नवगने आदींनी एकत्र येत रास्ता पेठेतील मराठा चौकामध्ये केली. त्यानंतर वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन मंडळाकडून करण्यात येऊ लागले. किल्लारी भूकंपातील नागरिकांची त्या ठिकाणी जाऊन मंडळातर्फे सेवा करण्यात आली. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांची सेवा मंडळाकडून केली जाते; तसेच या वर्षी कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी मंडळाने पुढाकार घेऊन मदत केली. मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाकडून वर्षभरात अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, दिवाळीमध्ये आदिवासींना कपडे, फराळाचे वाटप, रास्ता पेठेतील सफाई कामगारांना दिवाळी फराळवाटप, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे केले जातील, असे उमेश शेडगे यांनी सांगितले. त्याचबरोबर महोत्सवी वर्षानिमित्त गणपती मिरवणूक ध्वनिप्रदूषण न करता दोन तासांत पार पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Social activities