
हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. ‘नादब्रह्म’च्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने कैदी ढोल वाजविण्यास शिकले. हे कैदी चांगले वादन करीत असल्याने हे पथक कायमस्वरूपी असेल.
- सुनील रामानंद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, येरवडा कारागृह
पुणे - गेली कित्येक वर्षे कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना खुल्या वातावरणात, भर रस्त्यावर श्रीगजाननाच्या स्वागताच्या मिरवणुकीत ढोल-ताशा वाजविण्याची, त्यांची कला पुणेकरांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. कारागृहात नैराश्याचे जीवन जगत असताना या कैद्यांना आनंदक्षण अनुभवता आले. त्यांच्या वादनाला पुणेकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
सकाळी १०च्या सुमारास मिनी बसमधून येरवडा खुल्या कारागृहातील ३० कैद्यांना गणपती चौक येथे पोलिस बंदोबस्तात आणले. त्यांना फेटे बांधून ढोलवादनासाठी सज्ज केले. कमरेला बांधलेला ढोल आणि त्यावर ‘येरवडा खुले कारागृह पुणे’ असे लिहिलेले नाव पाहून पुणेकरांची उत्सुकता वाढली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या भाविकांनी या कैद्यांच्या वादनाला प्रतिसाद दिल्याने त्यांच्यात उत्साह संचारला. मिळणाऱ्या सन्मानामुळे कैदी भारावून गेले.
या क्षणांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. लक्ष्मी रस्ता ते अप्पा बळवंत चौक यादरम्यान सुमारे दोन तास कैद्यांनी जोशपूर्ण वादन केले. हा दुर्मिळ क्षण पुणेकारांनी कॅमेऱ्यात कैद केला.
कैद्यांना सामाजिक प्रवाहात आणण्याचे धारिष्ट्य कारागृह प्रशासनाने दाखविले; त्यामुळे हे शक्य झाले, असे गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी यांनी सांगितले.