आवाज कमी कर डीजे तुला...! 

आवाज कमी कर डीजे तुला...! 

गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी सामाजिक सुधारणा या उत्सवाच्या मूळ हेतूला कधीही धक्का लागू दिला नाही. उलट हा उत्सव सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक कसे ठरेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सध्या या उत्सवाचे स्वरूप ग्लोबल झाले असले तरी समाज एकत्र आणण्याची मूळ प्रेरणा हा उत्सव आजही जपत आहे. अशा परिस्थितीत उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल आणि ‘समाजप्रबोधना’चा मूळ धागा कुठेही उसवणार नाही याची दक्षता गणेश मंडळे आणि त्यांना सतत प्रोत्साहित करणाऱ्या गणेशभक्तांना घ्यावीच लागेल. मिरवणुकीचे स्वरूप ‘सेलिब्रेशन’ आणि ‘दणदणाट’ याकडे झुकले होते. मात्र ‘डीजे’चा दणदणाट ही पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची ओळख कधीच नव्हती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर ती राहणार नाही.

पुण्याची विसर्जन मिरवणूक हा राज्यातील गणेशोत्सवाचा मानबिंदू असते. ही मिरवणूक पाहण्यासाठी देशभरातून नागरिक पुण्यात दाखल होत असतात, ते या मिरवणुकीच्या वैविध्यासाठीच. रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोल-ताशा पथकांचे वादन, शाळांची ध्वज-टिपरी पथके, महिलांचा सर्व पातळीवरील सहभाग, अंध-अपंग-विशेष मुलांनी जीव ओतून केलेली प्रात्यक्षिके, सामाजिक संदेश देणारे हालते देखावे आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने मन मोहून टाकणारे रथ अशी कितीतरी वैशिष्ट्ये या मिरवणुकीविषयी सांगता येतील. त्यामुळे हातात तान्हुले बाळ, खाद्यांवर छोटुले घेऊन अनेक गणेशभक्त एवढी गर्दी असतानाही यात आनंदाने सहभागी होतात. 

उत्सवाच्या बदलत्या स्वरूपात ढोल-ताशा पथकांची ‘क्रेझ’ वाढली. हजारोंच्या संख्येने शहरी तरुण-तरुणी हौसेखातर यात सहभागी होऊ लागले. सहाजिकच या पथकांची संख्या वाढली आहे. मिरवणुकीत या पथकांकडून होणाऱ्या आवाजासोबतच सहभागींच्या वर्तनाचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. ढोलांचा हा ठेका सुखद व्हावा यासाठी पथकांमधील ढोलांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा प्रयोगही करण्यात आला. तरीही ध्वनिप्रदूषणाची निर्धारित पातळी ते ओलांडत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘सीओईपी’च्या पाहणीत आढळले आहे. एका बाजूला पारंपरिक वाद्यांच्या आवाजाचा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच दुसरीकडे ‘डीजे’च्या आवाजाने त्यावर कडी केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडत स्पीकरच्या भिंतींनी दहशत निर्माण केली आहे. स्पीकरच्या भिंती रचायच्या, विविध प्रकारचे प्रकाशझोत सोडायचे आणि त्यावर नाचत मिरवणूक ‘एन्जॉय’ करायची हा ‘ट्रेंड’ वाढला आहे.

टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीच्या रात्री जे काही ‘एन्जॉय’ केले जाते, त्याचा अतिरेक झाल्याने त्यावर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. रात्रीच्या वेळी अनेक मंडळे हे ‘डीजे’ जोरदार लावून त्यावर नाचणे यालाच विसर्जन मिरवणूक समजू लागले आहेत. 

पुण्यात दरवर्षी शिक्षणासाठी येणारे लाखो विद्यार्थी या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. ‘डीजे’चा दणदणाट यालाच ते पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक समजू लागतात. त्यामुळ, सामाजिक प्रबोधन म्हणून का असेना, विसर्जन मिरवणूक कशासाठी असते, हे आता या उत्साही मंडळांना समजावून सांगण्याची गरज आहे. हजारोंच्या संख्येने शेवटच्या दिवशी रस्त्यावर उतरणारी ही मंडळे वर्षभर काय करतात, याचा आढावाही धर्मादाय आयुक्तांनी घ्यायला हवा. 

ध्वनिप्रदूषणाचे आरोग्यावर होणारे दुष्पपरिणाम सर्वज्ञात असताना उत्सवाच्या नावाखाली चालणारा हा सांस्कृतिक अतिरेक कोठेतरी थांबवावाच लागेल. न्यायालयाचा निर्णय हे त्याचे पहिले पाऊल आहे. पण समाजप्रबोधनाचा वारसा असणाऱ्या पुण्यातील गणेश मंडळांनी स्वतःहून ‘डीजे’ ला आळा घातला तर, त्यांच्या या आदर्शवत वर्तनाने सुखाहून बाप्पालाही पुढच्यावर्षी लवकर यायला निश्‍चितच आवडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com