एरंडवणे - दरवर्षी प्रमाणे यंदाही वाजत गाजत बाप्पांचे स्वागत झाले. घरोघरी, मंडळांमध्ये थाटामाटात बाप्पा विराजमान झाले. बाप्पाच्या आगमनाआधी बरेच दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखाव्यासाठी धावपळ सुरू होते. आपल्या बाप्पासाठी प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करायची त्यांची तळमळ असते. यंदाच्या वर्षीही अनेक ठिकाणी देखाव्यांमध्ये वैविध्य दिसून आले. त्यात उठून दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे प्लॅस्टिक बंदीच्या नियमाचे अनेक मंडळे पालन करताना दिसत आहेत.

परिसरातील बऱ्याच मंडळांनी ऐतिहासिक देखाव्यांना पसंती दिली आहे. बुरूज, तटबंदी असलेले देखावे अनेक ठिकाणी होते. तर काही ठिकाणी जिवंत देखावे पहायला मिळणार आहेत.
कोथरूडमधील अनेक मंडळांनी प्लॅस्टिक बंदीमुळे इको-फ्रेंडली बाप्पा साकारले आहेत. पर्यावरणपूरक देखाव्यांना अनेक मंडळांनी प्राधान्य दिले आहे. कोथरूडमधील रामबाग कॉलनीजवळ साई मित्र मंडळाने यावर्षी किल्ल्यांचे बुरूज, तटबंदी असलेला देखावा सादर केला आहे. तटबंदी, बुरूज तयार करताना प्रामुख्याने थर्माकॉलचा वापर केला जातो. परंतु, साई मित्र मंडळाने कापडाचा वापर करून हे बुरूज आणि तटबंदी तयार केले आहेत. त्याचबरोबर नवनाथ सार्वजनिक मित्र मंडळाने जिवंत देखावा सादर केला आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित "इथे ओशाळला मृत्यू' हा जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्यांच्या नेपथ्यासाठीही कापडाचा देखावा सादर केला आहे.
या वर्षी प्लॅस्टिक बंदी असल्याने नेमका कोणता देखावा याचा विचार आम्ही बरेच दिवस करत होतो. त्यानंतर विचार करून जिवंत देखावा सादर करायचं ठरवलं. मग कलाकारांशी संपर्क साधून "इथे ओशाळला मृत्यू' हा जिवंत देखावा सादर केला. त्याचबरोबर त्यांचे नेपथ्यही पूर्ण कापडी आहे.
- नवनाथ शेडगे, अध्यक्ष, नवनाथ सार्वजनिक मित्र मंडळ
आता पुठ्ठ्यांच्या मखरांना मागणी
प्लॅस्टिक बंदीनंतर वेगवेगळ्या प्रकारचे मखर, माळा, सजावटीचे साहित्य बाजारात दिसत आहेत. प्लॅस्टिक बंदीनंतर कापडाच्या माळा त्याचबरोबर मखरांमध्येही वैविध्य दिसून आले. पुठ्ठ्यांचे मखर, नायलॉनचे पडदे, वेगवेगळे दिवे अशा अनेक आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. गणपतीनंतर गौरीही लगेचच विराजमान होत आहेत. त्यामुळे ग्राहकांची अजूनही बाजारामध्ये गर्दी दिसत आहेत. यंदाही सर्व बाजारपेठा लाईटींग, मखरे, रंगीबेरंगी माळांनी सजली आहेत.
यंदा प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडाच्या माळांना तसेच पुठ्ठ्याच्या मखरांनाही जास्त मागणी आहे.
- अशोक दाबी, विक्रेते, कोथरूड