लालबागचा राजा आणि सामाजिक प्रश्‍नांवर देखावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

गणपती देखावे - खडकी कॅंटोन्मेंट

पुणे -  पौराणिक, सामाजिक व ज्वलंत प्रश्‍नांवरील देखावे सादर करण्याची परंपरा खडकीमधील गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीही सुरू ठेवली आहे. खडकीतील बहुतांश मंडळांनी यंदा वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर केले असून, स्त्रीभ्रूणहत्या, वृक्षतोड, वीज-पाण्याचा अनिर्बंध वापर यांसारख्या विषयांवर जनजागृती करणारे देखावे सादर करण्यावरही मंडळांनी भर दिला आहे. बहुतांश देखावे खडकी व परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

मुंबईतील ‘लालबागचा राजा’च्या प्रतिकृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या व्यापारी मित्र मंडळाच्या ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खडकी परिसरातील सर्वांत उंच मूर्ती म्हणूनही या मंडळाचा उल्लेख केला जातो. दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करणारे मंडळ म्हणून डेपोलाइन मित्र मंडळ ओळखले जाते. यंदा मंडळाने ‘रावणाचे गर्वहरण’ हा देखावा सादर केला आहे. हा देखावाही लहान मुलांचे आकर्षण ठरला आहे. विशेषत- मंडळाने यंदा स्त्रीभ्रूणहत्या, वृक्षतोड, वीज-पाण्याचा होणारा अनिर्बंध वापर अशा ज्वलंत प्रश्‍नावर फलकांद्वारे प्रकाश टाकला आहे. 

मधला बाजार मित्र मंडळाने यंदा रंगीबेरंगी पाट्यांवर खास पुणेरी विनोद व किस्से लिहिलेला देखावा सादर केला आहे. या पाट्यांवरील मजकूर वाचताना भाविकांचे चांगलेच मनोरंजन होते. धोबीगल्ली मित्र मंडळाकडूनही दरवर्षी देखावा सादर करण्यावर भर दिला जातो. या वर्षी मंडळाने तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे विलोभनीय रूप देखाव्यातून साकारले आहे. हा देखावा पाहण्यासाठी आणि श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. नवी तालीम मित्र मंडळाने काल्पनिक मंदिर साकारले आहे. 

मित्रसागर मित्र मंडळाने ‘ज्वालासूर’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. तर आकर्षक व विलोभनीय देखावे साकारणारे मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवा बाजार गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘गंगावतरण’ हा पौराणिक देखावा केला आहे. औंध रस्त्यावरील नवभारत तरुण मंडळाने विद्युत रोषणाईवर आधारित ‘कृष्णलीला’ हा देखावा सादर केला आहे. तर राम मंदिराजवळील अमर मित्र मंडळानेही काल्पनिक मंदिर साकारले आहे. देखाव्यांबरोबरच बहुतांश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचाही प्रयत्न केला आहे. मंडळांतर्फे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये वृक्षारोपण, अनाथ, वृद्ध, विशेष मुले, रुग्णांना मंडळांतर्फे आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली जाते.

Web Title: ganesh festival 2017 khadki ganesh ustav pune

टॅग्स